भक्तांनी नैसर्गिकतेच्या अधिक जवळ जावे
By admin | Published: December 21, 2016 11:09 PM2016-12-21T23:09:35+5:302016-12-21T23:09:57+5:30
घळसासी : ‘सुसंगती सदा घडो’ या विषयावर संवाद
नाशिक : दैनंदिन जीवनात इतरांचा द्वेष करणे चुक ीचे आहे. सकारात्मकता जिथे लाभेल तेथेच मानवाने अधिकाधिक वेळ घालवावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत विवेक घळसासी यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित प्रवचनप्रसंगी व्यक्त केले. गंगापूररोड येथील चैतन्यवाटिकेत आयोजित कार्यक्रमात ‘सुसंगती सदा घडो’ या विषयावर घळसासी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात पुढे बोलताना घळसासी यांनी स्वभावासाठी सुसंगतीचा ध्यास असणे आवश्यक असल्याचे सांगितले. कलीयुगात फक्त नामाच्याच आधाराने आपले जीवन सुकर होऊ शकते, असे सांगताना सुसंगतीसाठी नाम आवश्यक असून, नामानेच आपल्यातील कुसंगतीचे प्रमाण कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. निसर्गाच्या जवळ जाता येत नसेल तर नैसर्गिकतेच्या जवळ जावे आणि कृत्रिमतेचा अट्टहास सोडण्याचे आवाहनही घळसासी यांनी यावेळी केले.
निसर्गाच्या जवळ जाणे शक्य नसल्यास आपल्या हृदयात असणाऱ्या निसर्गाच्या अंतरंगाचा आनंद घ्यावा आणि याची अनुभूती आपण डोळे मिटून ध्यान केल्यावर निश्चितच घेता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मानवाने नेहमी गतीशी सुसंगत असायला हवे. गतीशी आपला मेळ संपला तर आपल्या जीवनातील आनंद संपेल असे सांगताना, आनंद मिळवताना दु:ख परतवून लावण्याचे आवाहनही विवेक घळसासी यांनी केले. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची सांगता गुरुवारी (दि. २२) विवेक घळसासी यांच्या ‘गुरू परमात्मा परेशु’ या विषयावरील प्रवचनाने होणार असून अधिकाधिक भक्तांनी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)