त्र्यंबकेश्वरला भाविकांकडून नियमांना हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 09:02 PM2021-02-22T21:02:18+5:302021-02-23T23:50:27+5:30
त्र्यंबकेश्वर : भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे शिवलिंगाच्या दर्शनासाठी सलग सुट्या आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या प्रांगणात मास्क घालणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. तथापि फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करण्यासाठी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार सूचना देऊनही भाविक मात्र दाद देत नसल्याचे चित्र आहे.
त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. कोरोना उपाययोजनांबाबत अधिकृतपणे लॉकडाऊन जाहीर झालेला नसल्याने प्रशासनाने येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत ह्यवेट अँड वॉचह्णची भूमिका घेतली आहे. दरम्यान सोमवारी (दि.२२) तालुका आरोग्य विभाग, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबक नगरपरिषद, पंचायत समिती, गटविकास अधिकारी, त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आदींची बैठक प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी शुभम गुप्ता यांनी बोलावली होती. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्याबाबत करावयाच्या उपाययोजना याविषयी सूचना देण्यात आल्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोविडचे चार रुग्ण गृहविलगीकरणात तर एक रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात एकही रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची नोंद नाही.