ब्रह्मगिरीच्या परिक्रमेला यंदाही भाविक मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:14 AM2021-08-01T04:14:09+5:302021-08-01T04:14:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : व्रतवैकल्याचा, सणावाराचा, शिवोपासनेचा सण म्हणजे श्रावण मास होय. यंदा ९ ऑगस्टपासून श्रावणमासास प्रारंभ ...

Devotees will miss the Brahmagiri Parikrama again this year | ब्रह्मगिरीच्या परिक्रमेला यंदाही भाविक मुकणार

ब्रह्मगिरीच्या परिक्रमेला यंदाही भाविक मुकणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : व्रतवैकल्याचा, सणावाराचा, शिवोपासनेचा सण म्हणजे श्रावण मास होय. यंदा ९ ऑगस्टपासून श्रावणमासास प्रारंभ होणार असून, सुरुवात सोमवारी आणि शेवटही सोमवारी असा योग जुळून आला आहे. श्रावणमासाच्या दर सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी लाखो शिवभक्त येत असतात. गतवर्षीप्रमाणेच यंदाही शासनाने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता ब्रह्मगिरीच्या परिक्रमेला परवानगी नाकारली आहे.

यावर्षी पाच श्रावण सोमवार येत असून, येत्या ८ ऑगस्टला आषाढ अमावास्या झाल्यानंतर ९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. सोमवारपासूनच श्रावणमासास प्रारंभ होणार असून, तर श्रावण अमावास्यादेखील सोमवारी असल्याने यावर्षीच्या श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. त्र्यंबकेश्वरी श्रावण महिन्यात मोठी गर्दी असते. विशेषत: श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीची परिक्रमा करण्यासाठी लाखो भाविक येत असतात. एसटी महामंडळाकडूनही त्यासाठी विशेष नियोजन केले जात असते; परंतु मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट श्रावण महिन्यावर असल्याने आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने शासनाने ब्रह्मगिरीच्या फेरीस परवानगी नाकारली असल्याची माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली आहे. शासनाने अजूनही मंदिरे खुली करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदाही भाविकांना ब्रह्मगिरीच्या फेरीला मुकावे लागणार आहे. त्र्यंबकेश्वर शहरात धार्मिक विधीही बंद आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासन अजूनही धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे यंदाही श्रावण मासात होणारी उलाढाल ठप्प होणार आहे. त्र्यंबकेश्वरी श्रावण मासात लाखो भाविक येत असल्याने अनेकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. गेल्या वर्षीही व्यावसायिकांना त्याचा फटका बसला. आताही त्याची झळ बसणार असल्याने व्यावसायिकांकडून निर्बंधाला विरोध होत आहे.

इन्फो

येत्या १३ ऑगस्टला नागपंचमी, १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्टला पारशी नववर्ष, तर दि. १७ ऑगस्ट रोजी मंगळागौरी पूजन, दि.१९ रोजी मोहरम, तसेच रविवारी दि.२२ रोजी रक्षाबंधनाचा सण आहे. ३० ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. दि.३ व ४ सप्टेंबर रोजी चतुर्थी पक्षाचा पर्युषण पर्व व पंचमी पक्षाचा पर्युषण पर्व आहे. दि.६ सप्टेंबर रोजी सोमवती अमाआस्या आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील सोमवती अमाआस्येला विशेष महत्त्व दिले जाते. श्रावण महिन्यात सणवार असल्याने सुट्यांचा काळ आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरी देवदर्शनासाठी नेहमी गर्दी होत असते. यंदा मात्र परवानगी नसल्याने भाविकांचा हिरमोड होणार आहेे.

Web Title: Devotees will miss the Brahmagiri Parikrama again this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.