अर्थमंत्र्यांचा ‘भक्तिभाव’ : त्र्यंबक, वेरूळला शासकीय खर्चाने दौरा
By admin | Published: March 4, 2016 11:55 PM2016-03-04T23:55:01+5:302016-03-04T23:59:39+5:30
ऐन दुष्काळात मंत्र्यांचे देवदर्शन!
नाशिक : एकीकडे विदर्भ व मराठवाड्यात तीव्र दुष्काळ पडला असताना आणि राज्याचे अख्खे मंत्रिमंडळ पाहणी दौरे करीत असताना, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मात्र भक्तीचा भलताच उमाळा दाटून आला आहे. बहुधा त्यामुळेच मंत्रिमहोदयांनी ऐन दुष्काळात महाशिवरात्रीच्या दिवशी शासकीय खर्चाने निव्वळ देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वर व वेरूळचा दौरा आखला आहे. विशेष म्हणजे, खुद्द मुनगंटीवार हे दुष्काळाच्या दाहक झळा सोसणाऱ्या विदर्भातील चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत.
पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा मार्चमध्येच महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण संकट ओढवले आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाड्याला भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या झळा तीव्र असून, पुढचे तीन महिने कसे काढावेत, या काळजीने बळीराजा हवालदिल झाला आहे. या संकटाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे अवघे मंत्रिमंडळ पाहणी दौऱ्यावर आहे. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला त्यातून कसा दिलासा देता येईल, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या संकटांत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थ, नियोजन व वनखाते सांभाळत असलेल्या मुनगंटीवार यांना मात्र दुष्काळावरील उपाययोजनांत लक्ष घालण्याऐवजी देवदर्शन महत्त्वाचे वाटत असल्याचे चित्र आहे. बहुधा त्यामुळेच येत्या सोमवारी जुळून आलेला महाशिवरात्रीचा योग त्यांना हुकवावासा वाटत नसावा. म्हणूनच दि. ७ मार्च रोजी मुनगंटीवार यांनी निव्वळ देवदर्शनासाठी शासकीय खर्चाने दौरा काढला आहे. माहिती कार्यालयाकडून त्यांचा हा दौरा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, दि. ७ रोजी मुनगंटीवार हे सकाळी ७ वाजता मुंबईच्या राजभवनातून शासकीय हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करतील. त्र्यंबकराजाचे दर्शन आटोपल्यावर सकाळी ८.४० वाजता त्यांचे हेलिकॉप्टर औरंगाबाद जिल्ह्णातील वेरूळच्या घृष्णेश्वराच्या दिशेने भरारी घेणार आहे. मुनगंटीवार या दौऱ्यात सहकुटुंब असतील का, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. तथापि, फक्त देवदर्शनासाठी आखलेल्या या दौऱ्यात मुनगंटीवार भलेही भोलेनाथाला दुष्काळ निवारणाचे साकडे का घालोत आणि ती मान्य होवो की न होवो; पण त्यांची ही प्रार्थना शासकीय तिजोरीला मात्र काही हजारांचा चुना लावणार असल्याची चर्चा आहे.