देवळाली कॅम्प पोलिसांनी भगूर पोलीस चौकीचे दार उघडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:13 AM2018-07-12T00:13:32+5:302018-07-12T00:13:47+5:30
भगूर पोलीस चौकी बंद या ‘लोकमत’मधील बातमीची दखल घेऊन बुधवारी देवळाली कॅम्प पोलिसांनी तत्काळ या चौकीतून दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली असून, यापुढे दररोज चौकी उघडी ठेवून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
भगूर : भगूर पोलीस चौकी बंद या ‘लोकमत’मधील बातमीची दखल घेऊन बुधवारी देवळाली कॅम्प पोलिसांनी तत्काळ या चौकीतून दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली असून, यापुढे दररोज चौकी उघडी ठेवून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ‘महिन्यातून पंधरा दिवस भगूर पोलीस चौकी बंदच’अशा आशयाचे वृत्त बुधवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आल्याने त्याची पोलीस यंत्रणेने गांभीर्याने दखल घेत, या चौकीसाठी जमादार ए. एस. ढगे, हवालदार अनिल अहिरे यांची नेमणूक करण्यात आल्याने त्यांनी बुधवारी सकाळी चौकी उघडून दोन महिलांनी केलेल्या तक्रार अर्जाचे कामकाज सुरू केले. या संदर्भात त्यांनी विचारणा केली असता, ते म्हणाले, पोलीस चौकी उघडी असते परंतु काही वेळा न्यायालयीन कामकाज, परिसरातील गावातील तक्रारींची चौकशी, बंदोबस्तासाठी अन्यत्र नेमणूक केली जात असल्यामुळे अशा कामांसाठी चौकी बंद ठेवावी लागते; मात्र यापुढे चौकी कायम चालू राहील. शिवाय भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत गावच्या नागरिकांनी भगूर पोलीस चौकीत फोन केला तरी त्याची दखल घेतली जाईल. दरम्यान, अनेक दिवसांपासून बंद राहणारी पोलीस चौकी बुधवारी उघडी असल्याचे पाहून भगूरकरांनी समाधान व्यक्त केले असून, समाजकंटक, टवाळखोर, गुन्हेगारांना मात्र असुरक्षित वाटू लागले आहे.