कॅशलेस प्रचारासाठी ‘डीजीधन’ मेळावा
By admin | Published: February 16, 2017 01:14 AM2017-02-16T01:14:51+5:302017-02-16T01:15:07+5:30
नाशिकची निवड : देशात निवडक शहरांत प्रयोग
नाशिक : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहार करण्यावर भर दिला असून, त्यासाठी देशपातळीवर काही ठराविक जिल्ह्यांमध्ये ‘डीजीधन’ मेळाव्यांचे आयोजन करून त्याद्वारे जनतेत जागृती करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची त्यासाठी निवड झाली असून, त्यात नाशिकचा जिल्ह्याचा समावेश आहे.
देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या या मेळाव्यांमागचा हेतू हा निव्वळ जनतेला रोकडविरहित व्यवहारासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच अशा सेवा देणाऱ्या कंपन्या, बॅँका व खासगी संस्था, सरकारी यंत्रणांना एकाच छताखाली आणून त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नांदेड व नागपूर चार जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक पातळीवर त्यासाठी ‘डीजीधन’ मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, त्याची सुरुवात गेल्या महिन्यात पुणे येथून करण्यात आली आहे.
येत्या २९ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याने त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच सर्व बॅँका, संस्था, खासगी प्रतिष्ठानांचे प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
शहरातील मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी स्टेडियम या ठिकाणी हा मेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रीयिकृत बॅँका, वित्तीय संस्था, कृषी, पुरवठा विभाग आदि खात्यांचे सुमारे दीडशेहून अधिक स्टॉल्स याठिकाणी लावण्यात येणार असून, मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांना जागेवरच बॅँकेचे खाते उघडून देण्याची सोय याठिकाणी करण्यात येणार आहे, त्याचबरोबर बॅँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करणे, नेट बॅँकिंगची सुविधा देणे, रोकडविरहित व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन करणे, कृषी खात्याकडून सध्या शासनाचे अनुदान थेट खात्यावर वर्ग केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्याची माहिती देणे, शक्य असल्यास त्यांचे आधार क्रमांक ‘ई-पॉस’ यंत्राशी जोडणे, रेशन दुकानदारांना पीओएस यंत्राच्या वापराबाबत प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड अशाा प्रकारे आर्थिक व्यवहाराशी संबंधित बाबींसाठी हा मेळावा भरविण्यात येणार आहे. मेळाव्याच्या दिवशी या ठिकाणी सर्वत्र मोफत वायफाय सुविधा पुरविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)