सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 07:44 PM2020-12-24T19:44:16+5:302020-12-24T19:44:16+5:30
सिडको : येथील पवननगर , त्रिमूर्ती चौक व पाथर्डी फाटयासह मुख्यरस्त्यांवरील व्यावसायिक व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांविरोधात सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने ...
सिडको : येथील पवननगर , त्रिमूर्ती चौक व पाथर्डी फाटयासह मुख्यरस्त्यांवरील व्यावसायिक व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांविरोधात सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली.या कारवाईत चार ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
महापालिका सिडको विभागाच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ मयुर पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहीमत पोलीस पथकाच्या सहकार्याने अचानक राबविण्यात आल्याने व्यवसाईकांची चांगलीच धावपळ उडाली .व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या लहान व्यावसायिकांना या मोहिमेचा मोठा फटका बसला असून उपजीविकेचे साधनच हिरावले गेल्याने या व्यावसायिकांच्या रोजीरोटी वर संक्रात आल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.
सिडकोच्या पवननगर,त्रिमूर्ती चौक,उपेंद्रनगर,माऊली लॉन्स ,पथर्डीफाटा परिसरात लहान-मोठ्या विक्रेते, दुकानदार, फेरीवाले यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे नागरिकांना चालण्यासाठी असलेले फुटपाथ अडवले जात असून रस्त्यावरील वाहने चुकवत ये-जा करावी लागते. मुळात रस्त्याच्या कडेला असलेले फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी असताना त्यावर होणारे अतिक्रमण वाढत आहे.
मात्र प्रशासनाकडून या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अनेकदा फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती . मात्र प्रशासनाकडून तात्पुरती कारवाई केली जात असून ,त्यांची पाठ फिरताच पुन्हा विक्रेते दाखल होतात. नुकत्याच झालेल्या प्रभागसभेतही नगरसेवकांनी वाढत्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याकडून वारंवार येणाऱ्या तक्रारीची गंभीर दखल घेत विभागिय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि फुटपाथवरील अतिक्रमणांकडे मोर्चा वळविला आहे.
या मोहिमेत चार विभागाचे पंचवीस कर्मचारी सहभागी झाले होते . यात वीस हातगाडया , चाळीस फलक , स्टील पायऱ्या , हार्डवेअर साहित्य , प्लास्टीक पुतळे असे साहित्य जप्त करण्यात आले . या मोहिमेत अधिक्षक दशरथ भवर,अतिक्रमण अधिकारी प्रदीप जाधव,श्रीराम गायधनी,दत्ता आहेर ,मयुर काळे यांच्यासह चार विभागांचे ट्रक, दोन पोलिस जीप, सहभागी झाले होते.