जिल्ह्यात धुवाधार
By admin | Published: September 18, 2015 10:20 PM2015-09-18T22:20:54+5:302015-09-18T22:29:48+5:30
धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ
जिल्ह्यात धुवाधार धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढसिन्नर : पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात वरुणराजाने हजेरी लावल्यानंतर रुसलेला पाऊस अंतिम चरणात सिन्नरकरांवर चांगलाच बरसला. गुरुवारी रात्री २ वाजेपासून पावसाला प्रारंभ झाला. सिन्नर शहरात मुसळधार, तर तालुक्यात सर्वदूर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरात सहा तासात तब्बल ८८ मिमी पाऊस पडला. यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. सलग पाचव्या वर्षी सिन्नरकर दुष्काळाचा सामना करीत आहेत. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पाऊस गायब झाला होता. सुमारे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री पावसाचे जोरदार आगमन झाले. गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. तालुक्यातील धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात का होईना वाढला आहे.पश्चिम भागातून उगम पावणारी म्हाळुंगी नदी वाहू लागल्याने भोजापूर धरणात पाण्याची आवक होणार आहे. शहराजवळील सरदवाडी धरणात ४० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा दुपारपर्यंत दिसून येत होता. तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास नळपाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळणार आहे. चालू पावसाळ्यात गेल्या बारा तासात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली असली तरी या पावसाने विहिरींना पाणी उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धरणांमध्ये चांगले पाणी आल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बीचा फायदा होऊ शकतो. यावर्षी खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नजरपीक आणेवारीत सिन्नर तालुक्याततील सर्व गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्यावरून दुष्काळाची व खरीप पिकांच्या नुकसानीचा अंदाज येतो.गणपतीच्या आगमनाबरोबरच पाऊस आल्याने ‘बाप्पा पावले’ अशीच चर्चा होतीे. शहरात पावसाचा जोर जास्त असून, ग्रामीण भागात मध्यम पाऊस आला. तालुक्यातील सर्व गावांमध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
टाकेद परिसरात संततधार
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात पहाटे ४ वाजेपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने परिसरातील लेंडी नाला, करंजीचा ओहळ व कडवा निद दुथडी भरून वाहत आहे.ब-याच दिवसापासुन बळीराजा पावसाची वाट पाहत होता.तरी सुध्दा काहीभागात रिम झीम सरी बरसत होत्या यामुळे समाधान होत नव्हते .भातिपकासाठी पावसाची आवश्यकता तर होतीच त्यातच शुक्र वारी गणपतीचे आगमन झाले व पहाटे चार पासुन पाऊसाने जी सुरवात केली ती सांयकाळपर्यंतही सुरूच होती .या पुर्वभागात पुर्ण टाकेद धामणगाव आंबेवाडी खो-यात आज कुठेही सुर्यदर्शन झाले नाही. या पावसामुळे गणेश मंडळांची बरीच तारांबळ ऊडाली तरी सुध्दा गणेशाचे आगमन सुखकारकच ठरल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.( वार्ताहर )