बुद्ध लेण्यांवरील धम्मलिपी संशोधनाची चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:14+5:302021-05-26T04:15:14+5:30
नाशिक : महाराष्ट्रात जेथे जेथे बुद्ध लेणी आहेत तेथे प्रत्यक्ष जाऊन तेथील शिलालेखांचा अभ्यास आणि संशोधन करण्याची चळवळ नाशिकमधील ...
नाशिक : महाराष्ट्रात जेथे जेथे बुद्ध लेणी आहेत तेथे प्रत्यक्ष जाऊन तेथील शिलालेखांचा अभ्यास आणि संशोधन करण्याची चळवळ नाशिकमधील काही तरुण राबवीत आहेत. बौद्ध साहित्य प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुरू झालेली ही मोहीम आता हाजारोंपर्यंत पोहोचली असून, लेण्यांवरील शिलालेख तसेच धम्मलिपीचा अभ्यास केला जात आहे. या माध्यमातून लेण्याच्या प्राचीन इतिहास उलगडण्यास मदत होत आहे.
महाराष्ट्र बुद्ध लेणी संशोधन आणि संवर्धन मंडळाच्या माध्यमातून नाशिकमधील काही तरुण-तरुणी यांनी लेण्यांच्या अभ्यास सुरू केला असून, त्या माध्यमातून बुद्ध लेण्यांचा प्राचीन इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात असलेल्या बुद्ध लेण्यांच्या ठिकाणी जाऊन तेथील शिलालेखांचा अभ्यास केला जात असल्याने लेण्यांचा इतिहास तसेच लेण्यांच्या निर्मितीची माहिती जगासमोर येत आहे. सम्राट अशोककालीन धम्मलिपी तसेच सातवाहनकालीन धम्मलिपी यांचा अभ्यास आणि संशोधन मंडळाचे कार्यकर्ते करीत आहेत.
या चळवळीत त्यांना अनेक तरुण जोडले गेले आहेत. ज्यांना बुद्ध तत्त्वज्ञान आणि संस्कृती या विषयीची आस्था आहे तसेच ज्यांना पुरातन लिपी आणि शिलालेखांचा अभ्यास करण्याची इच्छा आहे अशांना बरोबर घेऊन नाशिकमध्ये संशोधनाची चळवळ रुजविली जात आहे. संशोधक सुनील खरे यांच्यासह कविता खरे, प्रवीण जाधव, विजय कापडणे, संतोष वाघमारे, सौरभ भोसले, आनंद खरात, मनीषा डोळस, सुजय जाधव यांच्यासह अनेक या मोहिमेचा भाग झाले आहेत.
या मंडळाच्या माध्यमातून मोफत धम्मलिपीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये ५० टक्के महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गेल्या दीड वर्षापासून या मोहिमेला अधिक गती प्राप्त झाली आहे. याविषयी खरे यांनी सांगितले की, सातवाहनकालीन लिपी ही मुख्यत्वे महाराष्ट्रात आढळते. महिनाभराच्या प्रशिक्षणात पंधरा दिवस सम्राट अशोककालीन, तर पंधरा दिवस सातवाहनकालीन लिपी शिकविली जाते.
--कोट--
भारताची सर्वात प्राचीन लिपी म्हणून धम्मलिपी असल्याचे संशोधन पुढे आलेले आहे. बौद्ध संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास लेण्याच्या माध्यमातून मांडला जात असून, शिलालेखांवरून प्राचीन लेणी आणि त्या माध्यमातून बौद्ध परंपरा समोर आलेली आहे. लेणी तसेच शिलालेख वाचनाची मोहीम आता अधिक गतिमान झाली आहे. िट्रबल्स संस्थेचे अतुल भोसेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संशोधनकार्य या क्षेत्रात मार्गदर्शक ठरत आहे.
- सुनील खरे, महाराष्ट्र बुद्ध लेणी संवर्धन व संशोधन
(फोटेा आर ला आहेत)