रस्त्यासाठी धामोडे ग्रामस्थ मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:43+5:302021-09-17T04:19:43+5:30
येवला : तालुक्यातील धामोडे येथील ग्रामीण मार्ग क्रमांक २१७ या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता पूर्ववत खुला करून देण्याच्या मागणीसाठी ...
येवला : तालुक्यातील धामोडे येथील ग्रामीण मार्ग क्रमांक २१७ या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता पूर्ववत खुला करून देण्याच्या मागणीसाठी धामोडे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले.
तालुक्यातील धामोडे येथील ग्रामीण मार्ग क्रमांक २१७ हा कायमस्वरूपी वहिवाट रस्ता असून, लगत मोती नाला आहे. नाल्यावर ७ पाझर तलाव असून ते पूर्ण भरून वाहत आहेत. नाल्यालगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून नाल्याचे पाणी मार्ग २१७ या रस्त्यावर वळून दिल्याने रस्ता पाण्याखाली गेल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.
रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने परिसराचा संपर्क तुटला आहे. रस्त्याअभावी लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध यांची सतत गैरसोय होत आहे. या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. १६) सकाळी मुले, महिलांसह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले.
दरम्यान, तहसीलदार प्रमोद हिले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले.