धनश्री अहेर यांचा समिती सदस्यत्वाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:19 PM2018-09-07T23:19:42+5:302018-09-08T00:58:45+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे या कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य धनश्री केदा अहेर यांनी जलव्यवस्थापन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे या कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य धनश्री केदा अहेर यांनी जलव्यवस्थापन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी झालेल्या समितीच्या सभेप्रसंगी अहेर यांनी पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेत सभात्याग केला होता.
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीत पदाधिकाºयांवर तीव्र आक्षेप घेत अहेर यांनी आक्रामक भूमिका घेतली होती. शुक्रवारी त्यांनी अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यावर थेट आरोप करीत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांच्याकडेच सोपविला. अध्यक्ष सांगळे या कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्यामुळे जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या संबंधीचे कोणतेही कामे आपल्या गटात होत नसल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह अन्य पदाधिकाºयांविषयी सदस्यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. पदाधिकाºयांची कामे होत असताना आपल्या गटातील कामे होत नसल्याची ओरड सदस्यांकडून होती. मात्र याबाबत स्पष्ट कुणीही आवाज उठविला नव्हता.
धनश्री अहेर यांनी या प्रकाराला वाचा फोडताना स्वपक्षीय पदाधिकाºयांवरही आरोप केल्यामुळे असंतोष उघड झाला आहे. अहेर यांच्या भूमिकेनंतर आता अन्य सदस्यही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचेही समजते.
सदस्यांची कामे होत नसल्याबाबत यापूर्वीही स्थायी समिती आणि अन्य विषय समित्यांमध्ये चर्चा झाली आहे. सर्वसाधारण सभेत तर अध्यक्ष बोलण्यास पूर्ण संधी देत नसल्याची तक्रारी एका महिला सदस्याने यापूर्वी केली होती. धनश्री अहेर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता अन्य सदस्यांच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे.