धनगर समाजाचा आरक्षण प्रस्ताव अंतिम टप्प्यात
By admin | Published: May 28, 2016 11:28 PM2016-05-28T23:28:08+5:302016-05-29T00:17:49+5:30
गिरीश महाजन : होळकर जयंती कार्यक्रमात दिली माहिती
नाशिक : धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहेच; परंतु आरक्षण मिळण्यासाठी तांत्रिक बाजूदेखील तपासून पहाणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरक्षण संदर्भातील काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीतर्फे शनिवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात दिली.
परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत असताना उपस्थितांनी भाषण थांबवून ‘धनगरांना आरक्षण कधी मिळणार ?’ असा जाब विचारल्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगताना केंद्र सरकारनेही या आरक्षणाला मंजुरी देणे आवश्यक असताना या प्रक्रियेसाठी थोडा वेळ जाणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारने जरी आरक्षणाला मंजुरी दिली तर ते धनगर समाजाचे तात्पुरते समाधान असेल त्यामुळे सरकारवर धनगर समाजाने विश्वास ठेवायला हवा, असे अवाहनही महाजन यांनी यावेळी केले.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कायमच सकारात्मक दृष्टिकोन राहिला आहे. आरक्षणासाठी ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स’ या संस्थेकडून संशोधन आणि सामाजिक परीक्षण केले जात आहे. आधीच्या सरकारने आरक्षणाबाबत तत्कालीन केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असला तरी त्यातल्या त्रुटी दूर करून नव्याने प्रस्ताव सादर करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमांतर्गत गिरीश महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे लक्ष वेधत आरक्षणाची प्रक्रिया लांबणीवर पडत असून तातडीने आरक्षणाचा निर्णय घेण्याचे आवाहन केले. महात्मे यांनी धनगर समाजाची विविध गटात विभागणी झाली हे चुकीचे असून, सगळ्यांनी एकोप्याने काम करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, नाशिक यांच्यातर्फे ‘पुण्यश्लोक आदर्श विवाह पुरस्कार’, ‘वीर मल्हार पुरस्कार’ आणि इतर राज्यांतून आलेल्या ज्येष्ठ समाजसेवकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सांगता सोहळ्याप्रसंगी हेमंत शिंदे दिग्दर्शित ‘मी अहल्या बोलतेय’ या एकपात्री नाटकाचेही सादरीकरण करण्यात आले.
यावेळी आमदार बाळासाहेब सानप, डॉ. डी. एल. कराड, बापू शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास धनगर समाजबांधवांसह भाऊसाहेब तांबडे, टी. एस. बघेल, भवरसिंग होळकर, निरंजन धनगर, आमदार बाळासाहेब सानप, डॉ. सुनीता महाले, घनश्याम होळकर, रामेश्वर पाटील, गोरख जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)