धोकादायक झाडांविषयी निर्णय घ्या; शिंदे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:10 PM2017-07-29T14:10:08+5:302017-07-29T14:17:38+5:30
नाशिक : मुंबई येथे वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झाडे तोडण्यासंदर्भातील अर्जांची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबईत चेंबूर येथे एका सोसायटीत जीर्ण वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. सदरचे झाड धोकादायक असल्याने ते तोडण्यासाठी महापालिकेकडे तक्रार करूनही त्यांनी दखल न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. नाशिक शहरातही अनेक जीर्ण आणि धोकादायक वृक्ष असून, ते पाडण्यासाठी महापालिकेकडे नागरिकांनी अर्ज केले आहेत. मात्र, नाशिक महापालिकेत याबाबत कोणत्याही प्रकारे सत्वर निर्णय घेतला जात नाही, अशी तक्रार आहे. त्या पार्श्वभूमीवर विलास शिंदे यांनी निवेदन दिले आहे. सदरची झाडे पडून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याच्या आतच त्यावर निर्णय होण्याची गरज आहे. या अर्जांची पडताळणी करून जे वृक्ष खरोखरीच पाडण्यायोग्य आहेत त्यानुसार त्यांना परवानगी द्यावी आणि योग्य नसल्यास तसा अहवाल विशिष्ट कालमर्यादेत देणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वृक्षतोडीला मान्यता देण्याची सध्याची प्रक्रिया खूपच क्लिष्ट आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठका, मान्यता आणि प्रत्यक्ष पाहणी यातून मोठ्या प्रमाणात कालहरण होत असल्याने अशावेळी धोकादायक झाड आपोआप कोसळून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे सध्या महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही शेवटी निवेदनात करण्यात आली आहे.