मुस्लीम आरक्षणासाठी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 08:53 PM2018-08-10T20:53:47+5:302018-08-10T20:54:37+5:30
मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमिअत उलमा मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मुस्लीम समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अधोगती होत आहे. समाजाची अवस्था दयनीय झाली आहे. मराठा समाजासाठी १६ टक्के व मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षणाचा यापूर्वी अध्यादेश काढून नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. मात्र आरक्षण पुन्हा रद्द करण्यात आले. यामुळे मुस्लीम समाजाचे नुकसान होत आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या आंदोलनात जमिअत उलेमाचे अध्यक्ष मुफ्ती मो. आसिफ अंजुम मिल्ली, आमदार आसिफ शेख, मौलाना अब्दुल हमीद जमाली, मौलाना जमाल नासिर अय्युबी, कारी एकलाख अहमद, मौलाना अब्दुल हमीद अजहरी, मौलाना अय्युब कासमी, मौलाना आसिफ शाबान, हाफीज अनीस अजहर, डॉ. खालीद परवेज, रिजवान बॅटरीवाला आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.