मनुष्याच्या जीवनात धर्मच सुखकारक : सुरीश्वरजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:15 AM2019-01-28T01:15:47+5:302019-01-28T01:16:06+5:30
विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
नाशिकरोड : विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् धाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, धर्मक्रियेत भावनादेखील एकत्रित असावी त्यामुळे धर्मक्रियेत शुभध्यान करता येते. आज आपण धर्मापेक्षा धनाची किंमत अधिक मानतो म्हणूनच धन कमविण्यासाठी धर्माची आहुती देतो. दुकानात वेळेवर जाणारा कधी प्रवचनात जातो का? कदाचित वेळेवर दुकानी पोहचले नाही तर एखाद्या दिवशी नुकसान होईल, पण येथे चालू असलेल्या उपधानमध्ये सकाळ, दुपारच्या दोन्ही प्रवचनात जर उशिरा पोहचले तर जे नुकसान होईल त्याचा कुठे हिशोब लागणार नाही, असे जैनाचार्य सुरीश्वरजी यांनी सांगितले.
धर्म कसा करावा व शुद्ध धर्माचे फळ काय? याचे स्पष्टीकरण देताना शालिभद्रच्या कथेतील आई व मुलगा संगमचे रडणे ऐकून जमलेल्या महिलांना मुलाला खीर खाण्याची इच्छा पूर्ण करू शकत नसल्यामुळे रडत असल्याचे समजले. महिलांनी शेजारधर्म म्हणून आईचे सांत्वन करून आम्ही सर्व मिळून बाळाची खीर खाण्याची इच्छा पूर्ण करतो, असे सांगितले.
संकुचित वृत्ती धारण करणारी व्यक्ती कधीही इतरांचा विचार करूच शकत नाही आणि खऱ्या अर्थाने स्वत:चे आत्मकल्याण सुद्धा प्राप्त करू शकत नाही. पुर्वी घराबाहेर लिहिलेले असायचे ‘अतिथी देवो भव’ आणि आज घराबाहेर बोर्ड आढळतात ‘कुत्र्यापासून सावधान, परवानगी शिवाय प्रवेष निषेध’ असे बोर्ड लावुन आपण आपलेच कल्याण रोधित करीत आहोत असे जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराजा यांनी सांगितले.