सराईत गुंडांची गावातून धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:46 PM2020-07-25T23:46:24+5:302020-07-25T23:46:24+5:30
नाशिकरोड : जयभवानीरोड माणिकनगर येथे तीन दिवसांपूर्वी युवकावर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांची उपनगर पोलिसांनी माणिकनगर देवळालीगाव व सुंदरनगर परिसरातून धिंड काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : जयभवानीरोड माणिकनगर येथे तीन दिवसांपूर्वी युवकावर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांची उपनगर पोलिसांनी माणिकनगर देवळालीगाव व सुंदरनगर परिसरातून धिंड काढली.
जयभवानीरोड माणिकनगर येथे तीन दिवसांपूर्वी घराबाहेर रिक्षात बसलेला युवक कुणाल रामदास पोकळे याच्यावर युवकांनी हल्ला करून मारहाण करत कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर त्या युवकांनी देवळालीगाव खोडदे चौकात एका युवकाच्या मागे कोयता घेऊन धावत दहशत पसरवली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित ऋषिकेश उर्फ भारत निकम (रा. सुंदरनगर देवळालीगाव), अनिकेत राजेश जॉन उर्फ केरला, सिद्धांत सचिन धनेधर (दोघे रा. सुभाषरोड) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील दोघे संशयित अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके यांनी यावेळी रहिवाशांना परिसरात कोणी दादागिरी, टवाळखोरगिरी, भाईगिरी करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.पोलिसांनी ऋषिकेश निकम, अनिकेत जॉन, सिद्धांत धनेधर यांची शुक्रवारी जयभवानीरोड माणिकनगर व देवळालीगाव, सुंदरनगर या परिसरांतून धिंड काढली.