रुग्णालयात नातेवाइकांचा धिंगाणा; डॉक्टरांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:54+5:302021-04-05T04:13:54+5:30
------ नाशिकरोड : येथील दुर्गा उद्यानासमोरील रेडियन्ट प्लस रुग्णालयात कोरोना उपचार घेणाऱ्या वयोवृध्द महिलेचे निधन झाल्यानंतर शनिवारी रात्री त्या ...
------
नाशिकरोड : येथील दुर्गा उद्यानासमोरील रेडियन्ट प्लस रुग्णालयात कोरोना उपचार घेणाऱ्या वयोवृध्द महिलेचे निधन झाल्यानंतर शनिवारी रात्री त्या महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयात डॉक्टर व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण करून काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. धनंजय बाजीराव शंखपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुर्गा उद्यानासमोरील रेडियन्ट रुग्णालयात ते डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. रुग्णालयात कोविड-१९ सेंटर कार्यरत आहे. २६ मार्च रोजी सायंकाळी जेलरोड लोखंडे मळा अनमोल पार्क येथे राहणाऱ्या केशराबाई नरहरी सांबारे (६७) यांना त्यांच्या नातेवाइकांनी कोविड उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नातेवाईक रुग्णालयात येऊन ‘आम्ही रुग्ण केशराबाई यांना दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत,’ असे सांगून डिस्चार्ज घेतला. परंतु, त्यानंतर कोणीही केशरबाई यांना घेण्यास आले नाही. सायंकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयाकडून केशरबाई यांच्या नातेवाइकांना त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळविण्यात आले. रुग्णालयाकडून रुग्णास अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली होती. रात्री पावणे नऊच्या सुमारास उपचार सुरू असताना केशराबाई यांचे निधन झाल्याने याबाबत रुग्णालयाकडून त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. त्यानंतर केशराबाईंचे दहा-बारा नातेवाईक आले व त्यांनी डॉ. शंखपाळ यांच्या केबिनमध्ये येऊन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने लोखंडी राँडने रुग्णालयातील मेडिकलची काच फोडली. मेडिकलमध्ये काम करणारा हर्ष राजेश शेवानी यास झटापटीत हाताला दुखापत झाल्याने हाताला नऊ टाके पडले. या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.