ढिकले भाजपवासी; सानप यांच्या हाती घड्याळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:49 AM2019-10-05T01:49:16+5:302019-10-05T01:50:22+5:30
गेल्या तीन दिवसांपासून पूर्व नाशिक मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापल्यानंतर आता पक्षाचा उमेदवार कोण? या शक्यतांना विराम देत भाजपने मनसेतून थेट दाखल झालेले अॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज झालेल्या सानप यांनीदेखील शुक्रवारी (दि.४) हातात घड्याळ बांधले आणि राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला.
नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पूर्व नाशिक मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापल्यानंतर आता पक्षाचा उमेदवार कोण? या शक्यतांना विराम देत भाजपने मनसेतून थेट दाखल झालेले अॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज झालेल्या सानप यांनीदेखील शुक्रवारी (दि.४) हातात घड्याळ बांधले आणि राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला.
भाजपाने तीन दिवसांपूर्वीच पहिली उमेदवारी यादी घोषित केली. त्यात विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचे नाव नव्हते. उमेदवारीच्या पक्षांतर्गत स्पर्धेत स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे आणि मनसेचे अॅड. राहुल ढिकले यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर ढिकले की सानप, असा प्रश्न कायम होता. गुरुवारी तिसरी चौथी यादी भाजपाने घोषित केली तरी त्यात सानप यांचे नाव नव्हते दुसरीकडे राहुल ढिकले यांचा भाजपा प्रवेश सोहळा होऊन त्यांना उमेदवारी देणार अशी चर्चा असताना पक्षात अधिक वाद वाढू नये यासाठी पक्षाने एबी फॉर्म देऊन थेट मुंबईहून नाशिकला रवाना केले. त्यामुळे मध्यरात्री त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे तेव्हा सानप यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, सानप हेदेखील आपल्या संभाव्य उमेदवारी नाकारण्याच्या चर्चेने तयारीत होतेच. राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या संपर्कात ते होते. त्यांना दुपारी राष्टÑवादी कॉँग्रेसने उमेदवारीचा एबी फॉर्म दिला आणि त्यांनीदेखील या पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. सानप यांना उमेदवारी नाकारण्याच्या शक्यतेने त्यांचे समर्थक दोन दिवस संपर्क कार्यालयात येऊन ठाण मांडून बसत होते, तर सानप यांनी बंडखोरी करू नये, यासाठी समजूत काढण्याचेदेखील प्रयत्न सुरू होते.
‘त्यांनी’ उत्तर देणे टाळले...
भाजपने निवडणूक पूर्व केलेल्या सर्वेक्षणात माझी कामगिरी उत्तम असल्याचे दिसल्याने भाजपने मला उमेदवारी दिली असे सांगणाऱ्या राहुल ढिकले यांनी मनसेत असता तर उमेदवारी मिळाली असती का? असे विचारल्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले.