‘धोंडी धोंडी पाणी दे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:35+5:302021-07-11T04:11:35+5:30

कळवण- पावसासाठी सप्तशृंग गडावर हिंगवे येथील १०० ते १५० महिलांनी पायी जाऊन पाणी पडावे म्हणून देवीला साकडे ...

‘Dhondi Dhondi Pani De’ | ‘धोंडी धोंडी पाणी दे’

‘धोंडी धोंडी पाणी दे’

googlenewsNext

कळवण-

पावसासाठी सप्तशृंग गडावर हिंगवे येथील १०० ते १५० महिलांनी पायी जाऊन पाणी पडावे म्हणून देवीला साकडे घातले. देवीला साकडे घातल्यानंतर गावातील मारुतीला पाण्याने अभिषेक केला. पावसासाठी विनवण्या केल्या. पाऊस पडत नसल्याने शेतीचे कामे रखडली आहेत. लवकरात लवकर पाऊस पडून गावातील व तालुक्यातील शेतीची कामे पूर्ण होण्यासाठी देवीच्या प्रवेशद्वाराजवळ आई सप्तशृंगीला महिलांनी साकडे घातले.

गेल्या महिनाभरापासून तालुक्यातील बहुतांशी भागांत पावसाने दडी मारल्याने बहुतेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अजून झालेल्या नाहीत, तर काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असल्यामुळे तालुक्यातील हिंगवे गावातील ग्रामस्थ व महिलांनी डोक्यावर पाण्याने भरलेली कळशी घेऊन पायी चालत आद्यस्वयंभू श्री सप्तशृंगी मातेच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन पहिल्या पायरीला पावसाचे आगमन व्हावे यासाठी आई भगवतीकडे साकडे घातले व अभिषेक केला. यावेळी ‘धोंडी धोंडी पाणी दे’ अशी गाण्याची साद घालून नृत्य केले.

---------------------

शेतीची कामे रखडली

बऱ्याच दिवसांपासून तालुक्यात पाऊस पडत नसल्याने पेरणी झाली नाही, म्हणून शेतीची कामे रखडली आहेत. पाऊस पडावा यासाठी आम्ही पाणदेव काढून वरुणराजाला पारंपरिक पद्धतीने साकडे घातले तर पाऊस नक्की येतो अशी मनोभावना महिलांनी यावेळी बोलून दाखविली. सप्तशृंगी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी महिलांचे स्वागत केले.

-----------------------

मागील महिन्यापासून काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असून, त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे, तर बहुतेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनदेखील झाल्या नाहीत. म्हणून आम्ही हिंगवे गावातील ग्रामस्थ व महिलांनी पाऊस मागण्यासाठी आई सप्तशृंगी मातेला साकडे घातले आहेत.

- कैलास बागूल, सरपंच, हिंगवे

-----------------

आम्ही पाणदेव काढून वरुणराजाची मनोभावे आराधना केली तर पाऊस नक्की येतो, अशी आमची धारणा आहे म्हणून आम्ही पाऊस पडण्यासाठी आई भगवतीला साकडे घातले.

- सुभीबाई आहेर, हिंगवे (१० कळवण)

100721\10nsk_32_10072021_13.jpg

१० कळवण १

Web Title: ‘Dhondi Dhondi Pani De’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.