शेवटचे तीन दिवस रात्री बारापर्यंत धूम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:23 AM2018-09-18T01:23:11+5:302018-09-18T01:23:33+5:30
सर्वोच्च न्यायालयाने सण, उत्सवाच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास मुभा दिलेली असतानाही अशा दिवसांची माहिती गणेशभक्तांपासून दडपून ठेवली जात असून, त्याचाच भाग म्हणून सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत राज्य सरकारने गणेश मंडळांचे देखावे व वाद्य वाजविण्याची अनुमती दिलेली असताना पोलीस व जिल्हा प्रशासनाने त्याचा गाजावाजा न करण्यात धन्यता मानली आहे.
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने सण, उत्सवाच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास मुभा दिलेली असतानाही अशा दिवसांची माहिती गणेशभक्तांपासून दडपून ठेवली जात असून, त्याचाच भाग म्हणून सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत राज्य सरकारने गणेश मंडळांचे देखावे व वाद्य वाजविण्याची अनुमती दिलेली असताना पोलीस व जिल्हा प्रशासनाने त्याचा गाजावाजा न करण्यात धन्यता मानली आहे. असे असले तरी, शुक्रवार ते रविवार असे शेवटचे तीन दिवस गणेशभक्तांना रात्री बारा वाजेपर्यंत धूम करण्याची मोकळीक शासनाने दिल्यामुळे नाशिककरांना गणेशदर्शनाचा मध्यरात्रीपर्यंत लाभ घेता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारचे वाद्य वाजविण्यास निर्बंध घातले असले तरी, देशातील काही राज्यांमध्ये साजरे केले जाणारे सण, उत्सवांचा विचार करता वर्षभरातील पंधरा दिवस अशा प्रकारचे निर्बंध शिथिल करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात सोमवार, दि. १७ सप्टेंबर व २१ ते २३ सप्टेंबर असे चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्याची मुभा देणारी अधिसूचना गृहखात्याने यापूर्वीच जारी करून त्याची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना पोलीस व जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. तथापि, यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची भीती दाखवित पोलीस, महापालिका, जिल्हा प्रशासनाने गणेशभक्तांची या ना त्या कारणाने उत्सवापूर्वीच अडवणूक करण्यावर भर दिला. रस्त्यावर मंडप उभारणीच्या परवानगीपासून ते स्वागत कमानी व त्यावरील जाहिरातींवर कर आकारणी करून गणेशभक्तांचा छळ केला हे कमी की काय म्हणून श्री विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, डीजे वाजविण्यास बंदी घालून पारंपरिक वाद्य वाजविण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे एकूणच गणेशभक्तांसमोर पुढच्या वर्षी उत्सव साजरा करावा की नाही, अशी प्रश्न उभा ठाकला आहे. आता सरकारने रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यासाठी शिथिल केलेल्या नियमाची माहिती दडपण्यासही सुरुवात केली असून, यंदा नियमानुसार गणेशोत्सवात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास व देखावे खुले ठेवण्यास अनुमती असताना पोलीस व जिल्हा प्रशासनाने त्याची माहिती गणेश मंडळे व गणेशभक्तांपासून दडवून ठेवली आहे. परिणामी सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत अनुमती असतानाही पोलिसांनी रात्री दहानंतर गणेश मंडळांना त्यांची वाद्ये, ध्वनिक्षेपक व देखावे बंद करण्यास भाग पाडले आहे. आगामी तीन दिवस मात्र गणेशभक्तांना रात्री बारा वाजेपर्यंत मुभा आहे.