आजपासून नवरात्रोत्सवाची धूम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:13 AM2020-10-17T01:13:31+5:302020-10-17T01:13:58+5:30
अश्विन मासाची प्रतिपदा अर्थात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून, आज देवीची मंदिरे, सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी घटस्थापना केली जाणार आहे. यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे या सार्वजनिक उत्सवाचे उधाण काहीसे कमी असले तरी परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक कुळाचार पाळले जाणार आहेत. घटस्थापनेचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर ठेवलेल्या घटाच्यावर पसरलेल्या ताह्मनात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना केली जाते.
नाशिक : अश्विन मासाची प्रतिपदा अर्थात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून, आज देवीची मंदिरे, सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी घटस्थापना केली जाणार आहे. यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे या सार्वजनिक उत्सवाचे उधाण काहीसे कमी असले तरी परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक कुळाचार पाळले जाणार आहेत. घटस्थापनेचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर ठेवलेल्या घटाच्यावर पसरलेल्या ताह्मनात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. घटाभोवती पसरलेल्या निवडक मातीच्या वाफ्यात सप्तधान्ये पेरली जातात. या दिवशी घटाजवळ एकदा पेटवलेला नंदादीप पुढे नऊ दिवस-रात्र तेवत राहणार असतो. नवरात्रात प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे दुर्गासप्तशतीच्या एका एका पाठाचे पठन केले जाते. देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला सवाष्ण जेऊ घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणाचा स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. तर कुणी धान्यफराळ करतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो. देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक महिषासुरासह अनेक दैत्यांचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:’ आणि ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ अशी तिची प्रार्थना केली जाते.
बाजारपेठेत महिलांची गर्दी
n कोरोनाचा कहर काहीसा कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव होत असल्याने घरोघरी महिलांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे शुक्रवारी शहराच्या मुख्य बाजारपेठेत घट खरेदी तसेच लामण दिव्यासाठी वाती खरेदी आणि आणि अन्य कौटुंबिक खरेदीसाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनाचे सावट असले तरी परंपरेनुसार घरातला नवरात्रोत्सव पार पडावा याकरिता महिलांची बाजारात झुंबड उडाल्याचे शुक्रवारी दिसून आले.