दहावी, बारावी निकालात धुळे जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 11:29 PM2020-12-23T23:29:48+5:302020-12-24T00:55:27+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केला. विभागात दोन्ही परीक्षेत धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीचा विभागाचा निकाल ३७.४२, तर बारावीचा निकाल २३.६३ टक्के इतका लागला.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केला. विभागात दोन्ही परीक्षेत धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीचा विभागाचा निकाल ३७.४२, तर बारावीचा निकाल २३.६३ टक्के इतका लागला.
नाशिक विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत ३८८० पैकी १४५२ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.४२ टक्के इतकी आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून १७६६ पैकी ५५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ३१.४८ टक्के इतकी आहे. धुळे जिल्ह्यातील ३७० पैकी २१३ विद्यार्थी (५७.५७ टक्के), उत्तीर्ण झाले. जळगावमधील १०३४ पैकी ४९४ (४७.७८ टक्के), तर नंदुरबारमधील ७१० पैकी १८९ (२६.६२टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
इयत्ता बारावीची परीक्षा विभागात एकूण २९ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी ७५०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४९२ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले असून, १७७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी २३.६३ इतकी आहे. नाशिक जिल्ह्यातील ३९५२ पैकी ७४२ (१८.७८ टक्के) धुळे जिल्ह्यातील ७७७ पैकी २६१(३३.५९ टक्के), जळगाव जिल्ह्यातील १२६६ पैकी ३६८ २९.०७ टक्के), तर नंदुरबार जिल्ह्यातून १४९७ पैकी ३९९ (२६.६५) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विभागातील उत्तीर्णतेची टक्केवारी २३.६३ इतकी आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी दिली. यावेळी विभागीय सचिव राजेंद्र अहिरे उपस्थित होते.
दहावीत तीन कॉपी प्रकरणे आढळून आली, तर बारावीत मात्र एकही कॉपी प्रकरण समोर आले नाही. दहावीतील ३ प्रकरणांपैकी दोन विद्यार्थ्यांचा गैरमार्गाशी थेट संबंध नसल्याने त्यांचे निकाल जाहीर करण्याचे प्रस्तावित आहे. एका विद्यार्थ्याने गुन्हा कबूल केल्याने मंडळ शिक्षासूचीनुसार त्यांचे संबंधित विषयाचे गुण रद्द करण्यात आले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पडताळणी तसेच छायांकित प्रतींसाठी नियमानुसार संधी देण्यात आली आहे. गुण पडताळणीसाठी २४ तारखेपासून २ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यंना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनदेखील करता येणार आहे.