पेलिकन पार्कच्या नामकरणावरून धूमशान
By Admin | Published: May 25, 2017 01:20 AM2017-05-25T01:20:25+5:302017-05-25T01:20:48+5:30
नाशिक : सिडकोतील पेलिकन पार्कबाबत अद्याप न्यायनिवाडा झालेला नसताना आणि महापालिकेला पूर्णत: ताबा मिळालेला नसताना पेलिकन पार्कच्या नामकरणावरून मात्र शिवसेना-भाजपामध्ये धूमशान सुरू झाले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सिडकोतील पेलिकन पार्कबाबत अद्याप न्यायनिवाडा झालेला नसताना आणि महापालिकेला पूर्णत: ताबा मिळालेला नसताना पेलिकन पार्कच्या नामकरणावरून मात्र शिवसेना-भाजपामध्ये धूमशान सुरू झाले आहे. भाजपाने पेलिकन पार्कचे नामकरण ‘नमो उद्यान’ असे करण्याची मागणी केल्यानंतर शिवसेनेने आता पार्कला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची भूमिका जाहीर केली आहे. सिडकोतील पेलिकन पार्कबाबत अद्याप न्यायालयीन लढाई संपलेली नाही. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना भाजपा आमदाराने मात्र त्याचे ‘नमो उद्यान’ असे नामकरण करण्याची मागणी केल्याने शिवसेनेने त्यास हरकत घेतली आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन पेलिकन पार्कला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी करत भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे यासाठी शिवसेनेकडून केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली जात आहे, परंतु सावरकरांच्या नावाने पक्षसंघटना चालविणाऱ्यांना सावरकरांचा विसर पडला आहे. त्याचबरोबर सिडकोतील पेलिकन पार्कलाही सावरकरांचे नाव द्यावे, ही सेनेची अगोदरपासून मागणी आहे, परंतु आता नमो उद्यान अशा नामकरणाचा घाट घातला जात आहे. मात्र, महापालिकेने जनभावना लक्षात घेऊन सावरकरांचे नाव पार्कला द्यावे, अशी मागणी अभय दिघे, रवि पाटील, संतोष बच्छाव, सचिन धोंडगे, नितीन परदेशी, समाधान बोडके, इमरान शेख, दीपक थोरात आदींनी केली आहे.