गण खुला झाल्याने धुमशान रंगणार
By admin | Published: February 2, 2017 11:22 PM2017-02-02T23:22:41+5:302017-02-02T23:22:41+5:30
चास : इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांना डोकेदुखी
सचिन सांगळे नांदूरशिंगोटे
राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असलेला चास पंचायत समिती गण पुन्हा एकदा सर्वसाधारण झाल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. गेली अनेक वर्षे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा सदर गणावर आता आमदार राजाभाऊ वाजे यांचा प्रभाव दिसून येत आहे. या गणातून १९९७मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर दापूर येथील शुभांगी सुनील आव्हाड विजयी झाल्या होत्या. १९९९मध्ये त्यांना सभापतिपदाची संधी मिळाली होती.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने चास गणात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे. पूर्वीचा दापूर व गेल्या दहा वर्षांपासून चास या नावाने ओळखला जाणारा हा गण आरक्षणाचा अपवादवगळता गेल्या अनेक वर्षांपासून वंजारी समाजाचा उमेदवार विजयी होण्याची परंपरा आहे.
चास गणात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदय पुंजाभाऊ सांगळे (५८४७) यांनी कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार जगन पाटील भाबड (३५४१) यांचा दोन हजार ३०६ मतांनी पराभव केला होता. सांगळे यांनी एकहाती विजय मिळवून पंचायत समितीत प्रवेश केला होता. त्यानंतर सांगळे यांनी पाच वर्षे गटनेते म्हणून काम पाहिले. सहा महिन्यांपूर्वी सांगळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. चास गण सर्वसाधारण झाल्याने सांगळे यांना पुन्हा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सांगळे यांनी पाच वर्षाच्या काळात भोजापूर व दापूर परिसरात विविध विकासकामे मार्गी लावली आहे. खंबाळे येथे आयुर्वेदिक दवाखाना इमारत, मनेगावसह १६ गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा दुरुस्ती, पर्यावरण निधी असा विविध खात्यांमार्फत पाच वर्षांच्या काळात कामे राबविली आहे. पाच वर्षांपूर्वी सांगळे व बंडूनाना भाबड एकत्र काम करत होते. अलीकडच्या काळात दोघेही विरुद्ध बाजूला आहे. बंडूनाना भाबड यांची भूमिका या गणात महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
तेरा वर्षांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका सन १९९२ साली झाल्या होत्या. त्यावेळी दापूर गणाची निर्मिती झाली. त्यावेळेस चास येथील जगन पाटील भाबड यांच्या पत्नी कौशल्या भाबड यांनी नळवाडी येथील कमल म्हाळू दराडे यांचा पराभव केला होता.
२००२च्या निवडणुकीत चास या नावाने गणाची ओळख झाली. त्यावेळी हा गण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाला होता. त्यावेळेस दापूर येथील संगीता कडाळे विजयी झाल्या होत्या. त्यांनी चास येथील प्रयागा जाधव यांचा पराभव केला होता. चास गट महिलेसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांनी गणाकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी गणात लढत देण्याशिवाय पर्याय नाही. दिघोळेंनंतर आमदार राजाभाऊ वाजे यांचा वरचष्मा वाढल्याने शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. भाजपाने या गणात जोरदार व्यूहरचना केली आहे. दोन्हीही पक्षांकडून राजकीय डावपेच खेळण्यास प्रारंभ झाला आहे. शिवसेना व भाजपा या पक्षातील इच्छुकांनी गणात मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहे. दापूर व चास ही दोन्ही गावे महत्त्वपूर्ण असल्याने भौगोलिकदृष्ट्या या दोन्ही गावांत उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. दिघोळे यांना मानणारा हा गण असल्याने त्यांच्याच विचाराचा उमेदवार आतापर्यंत निवडून गेलेला आहे.