‘स्वाइन फ्लू’चे निदान पुण्याच्याच भरवशावर

By admin | Published: September 7, 2015 12:37 AM2015-09-07T00:37:11+5:302015-09-07T00:37:45+5:30

जिल्हा रुग्णालय : रविवारी पहाटे दोघांचा मृत्यू : नऊ महिन्यांत चाळीस बळी

The diagnosis of 'swine flu' relies on Pune | ‘स्वाइन फ्लू’चे निदान पुण्याच्याच भरवशावर

‘स्वाइन फ्लू’चे निदान पुण्याच्याच भरवशावर

Next

नाशिक : नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतअसून, ६ सप्टेंबरपर्यंत नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ तपोवनातील बजरंगीदास महाराज व इगतपुरी येथील गणपत गबाले यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला आहे़ दरम्यान, स्वाइन फ्लूच्या निदानाबाबत जिल्हा रुग्णालयाला पुण्याच्याच भरवशावर अवलंबून रहावे लागत असून, नाशिकमध्ये तपासणी केंद्राची मागणी केली जाते आहे़
हवामान बदलामुळे या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्येही उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या २७४ स्वाइन फ्लू संशयितांपैकी ४० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, २२२ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे़
जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात १ जानेवारी ते ६ सप्टेंबर या कालावधीत २७४ रूग्ण दाखल झाले होते़ त्यातील १९० रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह, तर ६८ रुग्णांचा पॉझिटिव्ह आला होता़ त्यापैकी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा ३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी (दि़६) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास तपोवनातील बजरंगीदास महाराज (६८) व इगतपुरी येथील गणपत रामचंद्र गबाले (६०) यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़
जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या स्वाइन फ्लू संशयित रुग्णांच्या घशातील द्राव अर्थात स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला जातो़ तेथील तपासणी अहवालानंतर या रोगाचे निदान होते़ मात्र जिल्हा रुग्णालयातून नियमितपणे हे स्वॅब दिले जात नसल्याचे समोर आले आहे़ एकदम चार-पाच रुग्णांचे स्वॅब एकत्र करून ते पुण्याला पाठविले जातात़ एक-दोन स्वॅबसाठी माणूस पाठविणे परवडत नसल्याचे सांगितले जाते़ त्यामुळे दिरंगाईने पाठविलेल्या या स्वॅबच्या तपासणी अहवालाबाबतही शंका उपस्थित केली जाते आहे़
सिंहस्थानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो साधू-महंत तसेच लाखो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात़ त्यात स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे पर्वणीकाळात तो बळावण्याची दाट शक्यता गृहित धरून त्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे़ तसेच काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या स्वॅबची तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्याची घोषणा करण्यात आली होती़ मात्र अद्याप तिची अंमलबजावणी झाली नसून पुणे येथेच स्वॅब तपासणीसाठी पाठवावे लागत आहेत़
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला स्वाइन फ्लू संशयित रुग्णाचा स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करणे गरजेचे आहे़ यामुळे केवळ नाशिकचाच नव्हे तर नाशिक विभागाचा प्रश्न सुटणार आहे़ तसेच डॉक्टर व रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार नाही़ या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींसह पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The diagnosis of 'swine flu' relies on Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.