लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी संवादसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:19+5:302021-05-24T04:14:19+5:30
तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात लसीकरणासंदर्भात आदिवासी बांधवांमध्ये अफवा पसरवून गैरसमज केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी ...
तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात लसीकरणासंदर्भात आदिवासी बांधवांमध्ये अफवा पसरवून गैरसमज केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी आदिवासी भागात कमी प्रमाणात लसीकरण होत असल्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी.ए. कापसे यांना आदिवासी भागातील गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा करण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत गावोगावी बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, अशी विनंती सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आयोजित बैठकीत नागरिकांशी संवाद साधताना केली. त्यांनी कळवण तालुक्यातील मोहमुख, बिलवाडी, सुकापूर, वडपाडा, पळसदर, मोहपाडा, देवळीकराड, लिंगामा, आमदर या गावांना भेटी देऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य जगन साबळे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, छबुलाल कुवर आदी उपस्थित होते.
इन्फो
या गावांमध्ये कमी लसीकरण
कळवण तालुक्यातील अभोणा पट्ट्यातील बोरदैवत, ओझर, अंबिका ओझर, मोहमुख, देवळीवणी, बिलवाडी, जामलेवणी, देसगाव, बेंदीपाडा, सरलेदिगर, देवळीकराड, लिंगामा, आमदर, वडाळा, पळसदर, मोहपाडा, तिऱ्हळ बु,, तिऱ्हळ खुर्द, खिराड, सुकापूर, वडपाडा येथे लसीकरण कमी प्रमाणात झाले असून, आदिवासी बांधवांची लसीकरण मोहिमेत उदासीनता हे आरोग्य यंत्रणेसमोरचे मोठे आव्हान ठरले आहे.