भगवंतासोबत संवाद दृढ व्हावा : अम्मा भगवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:30 AM2018-04-23T00:30:05+5:302018-04-23T00:30:05+5:30
जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्या माता-पित्यांचे आशीर्वादच उपयोगी ठरतात. त्यासाठी त्यांचा सन्मान करा, त्यांना आदराने वागवा तसेच जीवनात इच्छापूर्तीसाठी भगवंतासोबत संवाद दृढ व्हावा, असा संदेश अम्मा भगवान यांनी अनुयायांना दिला.
नाशिक : जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्या माता-पित्यांचे आशीर्वादच उपयोगी ठरतात. त्यासाठी त्यांचा सन्मान करा, त्यांना आदराने वागवा तसेच जीवनात इच्छापूर्तीसाठी भगवंतासोबत संवाद दृढ व्हावा, असा संदेश अम्मा भगवान यांनी अनुयायांना दिला. ईदगाह मैदान येथे अम्मा भगवान भक्तपरिवाराच्या परमज्योती श्री कल्की श्रीरामचंद्र इच्छापूर्ती वरदान कार्यक्रमात रविवारी (दि.२२) चेन्नईच्या नेमल येथील अम्मा भगवान यांच्या प्रवचनाचे कार्यक्रमस्थळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी अम्मा भगवान यांनी संदेशद्वारे थेट मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या धावपळ, ताणतणावाच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी, आनंदी व परिपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा असते. मात्र या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती नेहमीच संघर्ष करत असतो. या संघर्षातून मुक्ती मिळण्यासाठी तसेच जीवनात खऱ्या अर्थाने समाधानी होण्यासाठी अंतरंगातील भगवंतासोबतच आपला संवाद होवून संबंध दृढ झाला पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित भक्तपरिवाराला मार्गदर्शन करताना निवेदनाजी यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात भगवंत असताच. मात्र पैसे, संपत्ती, नाते संबंध आदी कारणांमुळे भगवंतासोबत संवाद होत नाही. या प्रकारामुळे व्यक्तींच्या जीवनात विविध प्रकारच्या अडचणी येवून संघर्षाचा सामना करावा लागतो. याचाच विचार करून अम्मा भगवान यांच्या प्रेरणेने मानव पुनर्उत्थान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पनेच्या माध्यामातून मानवाच्या हृदयातील भागवतांसोबत संवाद वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भगवंतासोबत संवाद वाढविण्यासाठी मानवामध्ये कृतज्ञता भाव असला पाहिजे. तसेच जीवनात यशस्वी, आनंदी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक अडचणी दूर होते, असेही यावेळी निवेदनाजी यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी संजय वाणी, गजानन दलाल, सी.एस. जाधव, बाळासाहेब काळे, एस. पी. जाधव, प्रतिभा पाठक, प्रशांत दलाल, पुंडलीक राऊत, वंदना ठाकरे, संजय पाठक, शैलेश भावसार, अर्चना जाधव, आदींनी सहकार्य केले. यावेळी जिल्हातील विविध ठिकाणांहून भाविक उपस्थित होते.