६७ वर्षांनंतर हिरे कुटुंबीयांविना लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:19 AM2019-10-14T00:19:42+5:302019-10-14T00:21:12+5:30
सध्याच्या मालेगाव बाह्य व पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाशी तब्बल ६७ वर्षे आपली नाळ कायम ठेवून सलग ४७ वर्षे मंत्रिपद भूषविणाऱ्या हिरे कुटुंबीयांनी यंदा या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी करणे टाळले; मात्र सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रान उठवून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.
नाशिक : सध्याच्या मालेगाव बाह्य व पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाशी तब्बल ६७ वर्षे आपली नाळ कायम ठेवून सलग ४७ वर्षे मंत्रिपद भूषविणाऱ्या हिरे कुटुंबीयांनी यंदा या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी करणे टाळले; मात्र सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रान उठवून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.
राजकारण व सत्ताकारणात मालेगाव तालुक्याची व पर्यायाने नाशिक जिल्ह्याची ओळख मुळातच कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यामुळे झाली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान व त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाऊसाहेबांनी कॉँग्रेस चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९५२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाऊसाहेब पहिल्यांदा नांदगाव मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले. त्यावेळी मालेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांचा नांदगाव मतदारसंघात समावेश होता. मालेगाव व दाभाडी हे दोन्ही मतदारसंघ अस्तित्वात नव्हते. १९५२ मध्ये भाऊसाहेब निवडून आले. त्यानंतर १९५७ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणुकीत बाजी मारली. १९६२ मध्ये भाऊसाहेब यांचे पुत्र व्यंकटराव हिरे यांनी नांदगावमधून उमेदवारी केली. ते पहिल्या निवडणुकीत विजयी झाले.
१९९९ मध्ये पुत्र प्रशांत हिरे हे एकदा येथून निवडून आले. २००४ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दादा भुसे यांची लढत प्रशांत हिरे यांच्याशी झाली. त्यावेळी भाजपकडून स्व. बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांना उमेदवारी दिली गेली; परंतु या निवडणुकीत दोन्ही हिरेंचा पराभव झाला व तेथून या मतदारसंघावरील हिरे कुटुंबीयांची पकड ढिली पडली. २००४ पासून ते २०१९ पर्यंत दादा भुसे यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला असला तरी, २००९ मध्ये पुन्हा प्रशांत हिरे यांनी उमेदवारी करून हिरे कुटुंबीयांवर विश्वास ठेवून असलेल्या मतदारांसमोर पर्याय उभा केला. त्यानंतर २०१४ मध्ये प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे यांनी स्व. भाऊसाहेब हिरे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नांदगाव मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी केली. त्यात त्यांचा पराभव झाला. यंदा मात्र २०१९ च्या निवडणुकीत म्हणजे तब्बल ६७ वर्षांनंतर मालेगाव बाह्य म्हणजे पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघातून हिरे कुटुंबातील कुणीही उमेदवारी करीत नाही; परंतु ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात हिरे कुटुंबातील चौथी पिढी प्रचारात उतरलेली दिसत आहे, तर डॉ. अपूर्व हिरे राष्टÑवादीकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत.
आणीबाणीनंतरच्या काळातही दाभाडीचा गड हिरेंकडेच१
१९६७ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर मालेगाव, नांदगाव तालुक्यातील काही गावे मिळून दाभाडी मतदारसंघाची निर्मिती झाली. १९६७ मध्ये व्यंकटराव हिरेंनी दाभाडीतून निवडणूक लढविली. त्यानंतर १९७२ मध्ये डॉ. बळीराम हिरे यांच्या रूपाने दुसºया पिढीकडे या मतदारसंघाची सूत्रे गेली. २
स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जारी केलेल्या आणीबाणीनंतरच्या काळात १९७८ मध्ये देशात सर्वत्र कॉँग्रेसचा पराभव झालेला असताना दाभाडीचा गड डॉ. बळीराम हिरे यांनी कायम राखला. १९८० मध्ये पुन्हा निवडणुका झाल्यावर डॉ. हिरे निवडून आले.
३ १९८५ मध्ये राज्यात पुलोदचा प्रयोग शरद पवार यांनी केला असता, दाभाडी मतदारसंघात स्व. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या स्नुषा पुष्पाताई व्यंकटराव हिरे यांनी भारतीय कॉँग्रेस (स) या पक्षाकडून उमेदवारी केली व त्यांनी त्यात डॉ. बळीराम हिरे यांचा पराभव केला. त्यानंतर सातत्याने १९९०, ९५ च्या निवडणुकीत पुष्पाताई हिरेंनी दाभाडीचा गड कायम राखला.
हिरे कुटुंबीयांनी केले पक्षांतर
सलग ४७ वर्षे मंत्रिपद ताब्यात ठेवणारे हिरे कुटुंबीय मूळचे कॉँग्रेसी विचारसरणीचे असले तरी, १९९९ मध्ये या कुटुंबाने पहिल्यांदा राजकीय घरोबा बदलला. प्रशांत हिरे यांनी सेनेत प्रवेश करून मंत्रिपदही मिळविले तर २००४ मध्ये प्रसाद हिरे यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर प्रशांत हिरे पुन्हा राष्टÑवादीत सामील झाले. २०१४ मध्ये प्रशांत हिरे यांच्या पुत्रांनी भाजपत प्रवेश केला. २०१८ मध्ये पुन्हा सर्व हिरे कुटुंबीय स्वगृही म्हणजे कॉँग्रेस विचारधारेकडे वळाले.