शनिवारी, रविवारीही सुरू राहणार दस्त नोंदणी कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:53+5:302021-06-27T04:10:53+5:30
नाशिक : कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे एप्रिल व मे महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे निश्चित कालावधीत नोंदणी ...
नाशिक : कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे एप्रिल व मे महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे निश्चित कालावधीत नोंदणी न झालेल्या दस्तांची नोंदणी करण्यासाठी आता शनिवारी आणि रविवारी नोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत. त्यासाठी प्रतिमाह एक हजार रुपये दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली असून ही रक्कम भरून नागरिकांना दस्तनोंदणी करता येणार आहे. यापूर्वी पाचव्या महिन्यात अडीच टक्के तर सहाव्या महिन्यात पाच टक्के दंडाची रक्कम आकारण्यात येत होती.
नोंदणी व मुद्रांक विभागात डिसेंबर २०२० तसेच मार्च २०२१ मध्ये मुद्रांक शुल्क सवलतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांनी मुद्रांक शुल्क भरणा केला आहे. परंतु कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ज्या नागरिकांना दस्त निष्पादित करून ठेवल्यापासून ४ महिन्यांच्या कालावधीच्या आत नोंदणी कार्यालयात दस्ताची नोंदणी करण्याचे राहून गेलेे आहे. त्याचप्रमाणे दस्त डिसेंबर २०२० मध्ये निष्पादित केलेला असेल अशा नागरिकांसाठी अभिहस्तांतरणपत्र , विक्री करारनामा दस्तास पहिल्या दोन महिन्यांसाठी व जानेवारी २०२१मध्ये निष्पादित केला असेल तर पहिल्या महिन्यासाठी देय शास्ती (दंड) कमी करून एक हजार रुपये करण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा नागरिकांना घेता यावा यासाठी रविवारी आणि शनिवारीही नोंदणी कार्यालये सुरू राहणार असून नागरिकांना ३० जूनपर्यंत संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आल्याची माहिती मुद्रांक जिल्हा निबंधक कैलास दवंगे यांनी दिली आहे.