होते नव्हते सारे नेले...
By Admin | Published: August 4, 2016 01:39 AM2016-08-04T01:39:18+5:302016-08-04T01:39:29+5:30
पूर ओसरला : व्यावसायिकांचे अतोनात नुकसान
संदीप झिरवाळ पंचवटी
कोणाच्या दुकानात पाणी गेले तर कोणाच्या टपऱ्या वाहून गेल्या, काहींचा माल भिजला, तर काही व्यावसायिकांच्या दुकानांचे केवळ सांगाडेच शिल्लक राहिले. गोदामाईला पूर आला आणि होते नव्हते सारे नेले.
मंगळवारी (दि. २) गोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरल्यानंतर गंगाघाट परिसरात विविध व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या शेकडो व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांकडे धाव घेतली अन् पुरानंतर दुकानांची झालेली परिस्थिती पाहून गोदामाईला हात जोडले. काहींना तर अश्रू अनावर झाले, झाले गेले गंगेला मिळाले म्हणत त्यांनी दुकानात शिल्लक असलेल्या वस्तू बाहेर काढण्याचे काम हाती घेतले होते. गोदावरीला आलेल्या पुरामुळे गंगाघाट परिसरात व्यवसाय करणाऱ्या शेकडो व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
गोदावरीला आलेल्या पुराचे पाणी ओसरल्यानंतर बुधवारी सकाळी गंगाघाटावर विविध व्यवसाय करणारे हातगाडीधारक, हॉटेल व्यावसायिक, कपडे दुकानदार, किराणा दुकानदार, देवदेवतांचे फोटो विक्रेते, प्रसाद फूल विक्रेते व अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी दुकानांकडे धाव घेतली आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे चित्र बघून व्यावसायिकांवर जणू आभाळच कोसळले. दुकानातील टेबल, खुर्च्या, कपडे, धान्याचे पोते, गोदामाईच्या पुरात वाहून गेले होते.
एवढेच नव्हे तर दुकानात लावलेले देवदेवतांचे फोटोही गोदामाईत वाहून गेल्याने व्यावसायिक हतबल झाले. मंगळवारी आलेल्या पुरामुळे नारोशंकर मंदिराबाहेर असलेले सर्वच दुकानात पाणी शिरले होते, तर मालेगाव स्टॅण्ड उतार, सरदारचौक, कपालेश्वर पोलीस चौकी परिसर, रामसेतू पुलावरील टपऱ्या व गंगाघाट सांडव्यावरची देवी ते रामकुंडापर्यंत असलेल्या सर्वच दुकानांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या दुकानातील वस्तू वाहून गेल्या, तर काहींच्या दुकानात पाच फुटापर्यंत गाळ साचलेला होता.
काही दुकानांचे केवळ सांगाडेच शिल्लक होते.