ऐकलं का... निवडणुकीनंतर मला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 01:06 PM2024-05-19T13:06:17+5:302024-05-19T13:06:50+5:30
"शिर्डीची जागा देण्यात आली नाही, पण राज्यसभेवर घेतले जाणारच"
नाशिक : लोकसभा निवडणुकीत मी महायुतीकडे दोन जागा मागितल्या होत्या. मात्र, शिर्डी मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही जागा मला देण्यात आली नाही. मात्र, मला राज्यसभेत संधी मिळणारच आहे आणि निवडणुकीनंतर कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी दिले आहे, असा दावा रिपाइं आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केला.
एनडीएला चारशे जागा मिळतील
महायुतीच्या प्रचारासाठी आठवले नाशिक दौऱ्यावर आले होते, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइंला दोन जागा मिळाव्यात, अशी मी मागणी केली होती. कारण दोन जागांमुळे मला मिळणारी मते राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यास उपयुक्त ठरली असती. मात्र, दोन्ही जागा नाकारल्या. परंतु, राज्यसभेत मला संधी मिळेलच.
एनडीएला अत्यंत अनुकूल वातावरण असून, चारशे जागा मिळतील. महाराष्ट्रात काहीही झाले तरी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू येथे प्रथमच भाजपला अधिक जागा मिळतील, असा दावाही आठवले यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच मोदींना मोठे केले
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेले कथित वादग्रस्त विधान त्यांनी केलेच नसावे, असे रामदास आठवले म्हणाले. संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळच दिले आहे, त्यामुळे नड्डा असे बाेलले असतील असे वाटत नाही, असेही आठवले म्हणाले.