आपल्या अन्नपदार्थात भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:20 AM2021-08-19T04:20:07+5:302021-08-19T04:20:07+5:30
सातपूर : ‘अन्न सुरक्षित तर आरोग्य सुरक्षित’ या उक्तीनुसार अन्न उत्पादक व व्यावसायिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. कोणी ...
सातपूर : ‘अन्न सुरक्षित तर आरोग्य सुरक्षित’ या उक्तीनुसार अन्न उत्पादक व व्यावसायिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. कोणी भेसळ करून सदोष अन्नपदार्थ विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाची यावर करडी नजर असते. गेल्या आठ महिन्यांत टाकलेल्या छाप्यात घेतलेल्या शंभर नमुन्यांमध्ये दोन ठिकाणी भेसळ आणि कमी दर्जा आढळला. ३४ नमुने प्रमाणित आढळून आले असून, ६४ नमुने लॅबकडे प्रलंबित आहेत. अन्नपदार्थांतील भेसळीमुळे त्याचा थेट आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून वर्षभर छापे टाकून ते रोखण्याचे काम केले जाते. अन्न उत्पादक किंवा विक्रेत्याकडून लहानशा चुकीमुळे, दुर्लक्षामुळे असो अथवा हेतुपुरस्सर किंवा अनवधानाने असो त्याला कायद्यात माफी नाही.
इन्फो :-
भेसळ किती?
महिना नमुने भेसळ प्रमाणित प्रलंबित
जानेवारी- ०३ ०० ०१ ०१
फेब्रुवारी २६ ०१ २५ ००
मार्च ३४ ०० ०८ २६
एप्रिल ०० ०० ०० ००
मे ०० ०० ०० ००
जून १७ ०१ ०० १६
जुलै १२ ०० ०० १२
ऑगस्ट ०९ ०० ०० ०९
---------------------------------------------------------------------
१०० ०२ ३४ ६४
इन्फो :- खरेदी करताय, अशी घ्या काळजी
अन्न व औषध प्रशासन जागरुक आहे; पण प्रशासनाचेच काम आहे, असे म्हणून चालणार नाही. ग्राहकानेदेखील जागरूक राहणे आवश्यक आहे. बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याचे पॅकिंग व्यवस्थित आहे का? एक्स्पायरी डेट कोणती आहे. प्रमाणित केल्याचे नमूद आहे का? याबाबी तपासून घेणे गरजेचे आहे; अन्यथा त्याचा आरोग्यावर अनुचित परिणाम होऊ शकतो. कुठे काही चुकीचे घडत असेल? चुकीचे वाटत असेल तर प्रशासनाला कळविणे आणि खरेदी करताना चोखंदळपणे पाहणे आवश्यक असल्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून केले जाते.
इन्फो : सणासुदीच्या काळात होते अधिक भेसळ
साधारणपणे श्रावण महिन्यापासून सणांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा, गणेश चतुर्दशी, गौरी गणपती, दसरा, दिवाळी, अशा सणांमध्ये दुग्धजन्य मिठाईचे पदार्थ, लाडू, चकल्या, गूळ, बेसन, अशा अनेक पदार्थांना मागणी असते. ग्राहकांची खरेदीसाठी असणारी गर्दी लक्षात घेऊन भेसळ मोठ्या प्रमाणात होते. ग्राहक नेमका इथेच फसतो. या काळात अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.
इन्फो :- आपल्याकडे प्रामुख्याने दूध, पेढा, खवा, गोडेतेल, दुग्धजन्य मिठाई, यामध्ये भेसळ आढळते. दूध व खव्यातील भेसळ शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे यावर लक्ष देऊन धडक कारवाई केली जाते. तक्रार आल्यास किंवा भेटी देताना नियमबाह्य आढळल्यास अन्नपदार्थांचे नमुने घेतले जातात. अहवाल आल्यावर कारवाई केली जाते.
-चंद्रशेखर साळुंखे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (अन्न)