डिझेल शवदाहिनी तीन महिन्यांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:35 AM2018-05-31T00:35:06+5:302018-05-31T00:35:06+5:30
पर्यावरण रक्षणाचा विचार करून महापालिकेने नाशिक अमरधाममध्ये सुरू केलेली डिझेल शवदाहिनी गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने आणखी दोन ठिकाणी डिझेल शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे.
नाशिक : पर्यावरण रक्षणाचा विचार करून महापालिकेने नाशिक अमरधाममध्ये सुरू केलेली डिझेल शवदाहिनी गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने आणखी दोन ठिकाणी डिझेल शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे. तथापि, एकमेव शवदाहिनीची दुरुस्ती होत नसताना नव्यांची तरी देखभाल दुरुस्ती होईल काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. नाशिक शहरातील सर्वच अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. अंत्यसंस्कारासाठी लाकूडही दिले जाते. त्यामुळे वृक्षतोड टळावी तसेच जलदगतीने अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी मनपाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर नाशिक अमरधाममध्ये डिझेल शवदाहिनी उभारण्यात आली होती. त्याला सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, नंतर प्रतिसाद वाढत गेला. परंतु महापालिकाच या शवदाहिनीकडे लक्ष पुरवत नाही. ती अनेकदा बंद असते. आताही गेल्या तीन महिन्यांपासून शवदाहिनी बंद असून, तिची दुरुस्तीच सुरू आहे. नाशिकमध्ये या स्वरूपाचे काम करणारी कंपनी नसल्याने ठाणे येथील एका कंपनीला हे काम दिले जाते. त्यानुसार कंपनीने काम पूर्ण केले आहे. मात्र, चिमणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्याच्या ठेकेदाराने चिमणीच्या दुरुस्तीचे काम स्थानिक ठेकेदाराला दिले असून, त्याच्याकडून विलंब होत असल्याने अद्यापही शवदाहिनी कार्यान्वित होऊ शकलेली नाही. नाशिकमध्ये आता नागरिकांचा डिझेल शवदाहिनीकडे कल वाढला असून, महिन्याकाठी दोन ते तीन अंत्यसंस्कार डिझेल शवदाहिनीत होतात.