वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचा अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:57 AM2019-01-22T01:57:32+5:302019-01-22T01:57:56+5:30
पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करून सोमवारी दुपारी शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारच्या जेवणावर बहिष्कार टाकून अन्नत्याग आंदोलन केले.
पंचवटी : पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करून सोमवारी दुपारी शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारच्या जेवणावर बहिष्कार टाकून अन्नत्याग आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे वसतिगृह व आदिवासी विकास विभाग प्रशासनाची काही काळ धावपळ उडाली होती. सायंकाळी पाच वाजेनंतर कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरू होते. आदिवासी विकास विभागाच्या पेठरोड एकलव्य निवासी शाळा व वसतिगृहात चारशेहून अधिक विद्यार्थी राहतात. त्यात इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे साडेतीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना भोजन पुरविण्याचा ठेका आदिवासी विकास विभागाने टाटा कंपनी सेंट्रल किचन संस्थेकडे दिला आहे.
यंत्रावर तयार केलेल्या पोळ्या वाटप
एकलव्य निवासी शाळा व वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाºया संस्थेमार्फत यंत्रावर बनविलेल्या पोळ्या दिल्या जातात. मात्र या पोळ्या कच्च्या राहत असल्याने तसेच भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने जेवण बेचव लागते. निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यंत्राऐवजी हाताने बनवलेल्या पोळ्या विद्यार्थ्यांना द्याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.