शहरातील पेट्रोल पंपांवर वेगवेगळे दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:26 AM2018-09-19T00:26:35+5:302018-09-19T00:28:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असून, संपूर्ण राज्यासह देशभरात या इंधन दरवाढीच्या भडक्यात होरपळून निघत असताना नाशकात पेट्रोलच्या किमतींनी नव्वदीचा टप्पा पार केला आहे. तर डिझेलचे दर ७७.६३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशाप्रकारे महागाईचा भडका उडालेला असताना नाशिक शहरातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर वेगवेगळे दर आकारून पेट्रोलियम कंपन्या आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे दिसून आले आहे.
नामदेव भोर । नाशिक :

पेट्रोलच्या किमतीत तफावत
नाशिक शहरातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर इंधनाचे वेगवेगळे दर आकारले जात असल्याने नाशिककरांकडून पेट्रोलच्या दरांबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. संकेतस्थळासह पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनकडून जाहीर होणारे दैनंदिन पेट्रोल-डिझेलचे दर आणि प्रत्यक्षात शहरातील विविध पेट्रोल पंपांवर केल्या जाणाऱ्या दर आकारणीमध्ये तफावत आढळून येत आहे. शहरात पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशनने मंगळवारी ८९.९७ रुपये असा दर जाहीर करण्यात आलेला असला तरी शहरातील काही पेट्रोल पंपांवर मात्र नव्वदहून अधिक रुपयांना पेट्रोलची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.
दरफलकाचा अभाव
शहरातील काही पेट्रोल पंपांवर रोज बदलणाºया इंधन दराची ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी ‘दरफलक’ लावलेले पहायला मिळाले.
काही पेट्रोल पंपांवर दरफलक लावण्याकडे पेट्रोल पंपचालकांनी काणाडोळा केला आहे.
पेट्रोल पंपांच्या पाहणीत असे आढळले...
शहरातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवरील किमतीची वास्तविकता जाणून घेण्यासाठी लोकमतने मंगळवारी केलेल्या पाहणीत भारत पेट्रोलियमच्या कॉलेजरोडवरील श्रद्धा पेट्रोल पंप व त्र्यंबकरोडवरील विनोद आॅटोमोबाइल या पेट्रोल पंपावर पेट्रोल ८९ रुपये ९५ पैसे तर डिझेल ७७ रुपये ६१ पैसे दराने विकले जात होते. तर इंडियन आॅइलच्या त्रिमूर्ती चौकातील गोविंदा फ्युएल स्टेशनवर पेट्रोल ८९ रुपये ९० पैसे, तर डिझेल ७७ रुपये ५७ पैसे इतक्या कमी दराने विक्री होत असल्याचे दिसून आले. त्र्यंबकनाका येथील आरके सर्व्हिस गॅरेज या पेट्रोल पंपावर पेट्रोल ८९ रुपये ९९ पैसे तर डिझेल ७७ रुपये ६६ पैसे दराने विकले जात होते. महात्मानगर येथील एस्सार पेट्रोल पंपावर पेट्रोल ८९ रुपये ९९ पैसे दराने विक्री होताना आढळून आले. या पेट्रोल पंपावर कोणताही दरफलक नव्हता. तर सर्वाधिक दर गंगापूररोड भागातील रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर दिसून आले. येथे पेट्रोल ९० रुपये ३ पैसे, डिझेल ७७ रुपये ६४ पैसे दराने विकले जात असल्याचे दिसून आले.