आदिवासींना अंडी पोहोचविण्यात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:53 PM2020-04-25T23:53:34+5:302020-04-25T23:53:53+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संचारबंदी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी आॅनलाइन संपर्क साधून नियमित कामकाजाचा आढावा घेतला.
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संचारबंदी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी आॅनलाइन संपर्क साधून नियमित कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लॉकडाउनमुळे ग्रामीण भागात अंडीचा व केळीचा पुरवठा करण्यात येत असलेल्या अडचणीसमोर आल्या असून, दूरवरच्या वाहतुकीमुळे अंडी फुटण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कोणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलेला असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या मासिक सभा होत नाही, मात्र कामकाजाचा आढावा घेणे गरजेचे असल्याने महिला व बालकल्याण सभापतींनी जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बालविकास प्रकल्पातील कामकाजाचा आढावा घेतला. त्यात अंगणवाडीतील बालकांना ५० दिवस पुरेल इतका पोषण आहाराचे वाटप झालेले असून, ३० मेपर्यंत पुरेल इतका आहार पुरवठा करण्यात आला आहे. तसेच गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींनादेखील आहाराचे वाटप झाले आहे. मालेगाव प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी अति दक्षता घेऊन आहाराचे वाटप करावे, अशा सूचना सभापतींनी दिल्या. कुपोषित बालकांची संख्येत वाढ होऊ नये यासाठी त्यांना ताजा आहार देण्याची कार्यवाही सुरू असून, सभापती अश्विनी आहेर यांनी राज्याचे महिला व बालविकास आयुक्तयांच्याशी चर्चा करून सर्व बालकांना १५ मेपासून गरम ताजा आहार देण्यास मान्यता दिली आहे, असे महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे यांनी सांगितले.
आदिवासी भागात ‘अमृत आहार’ वाटपासाठी केळी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अंडी वाटपाचे काम केले जात असले तरी, स्थानिक गावात अंडी उपलब्ध करताना आदिवासी भागात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. इतर गावांतील बाजाराच्या ठिकाणाहून अंडी आणून पुरवठा केला जात आहे. मात्र अंड्यांची वाहतूक करताना अंडी फुटण्याचे प्रमाण वाढल्याचे सुरगाणा व त्र्यंबकेश्वरच्या अधिकाºयांनी सांगितले. असे असले तरी, अंडी वाटपात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल असल्याचे सांगण्यात आले.