ग्रामीण रु ग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे अडचणी
By admin | Published: July 10, 2016 10:20 PM2016-07-10T22:20:47+5:302016-07-10T22:43:03+5:30
ग्रामीण रु ग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे अडचणी
बेलगाव कुऱ्हे : महिला रुग्णांची मोठी गैरसोय; जनतेत संतापाची लाटबेलगाव कुऱ्हे : जिल्ह्यातील सात ग्रामीण रुग्णालयांमधून गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमासाठी निवड झालेल्या घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे सध्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जनतेच्या संतापास सामोरे जावे लागत आहे.
आगामी काही दिवसात एकमेव महिला वैद्यकीय अधिकारी प्रसूतीच्या रजेवर जाणार असल्याने महिला
रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची चार पदे असताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश घोलप हे रुग्ण तपासणी, स्त्रीरोग, प्रसूती, शवविच्छेदन, न्यायालयात सुनावण्या, नेत्ररोग, वृद्धांसाठी वयाचे दाखले, वरिष्ठांच्या नियमित बैठका, दैनंदिन प्रशासकीय कामकाज ही सर्व कामे एकटेच पाहत आहेत. या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे डॉ. घोलप मेटाकुटीला आले आहेत. त्यांच्या चोख कामांमुळे जनतेत त्यांचे अत्यंत चांगले गुणगान केले जात असले, तरी रु ग्णालयात रोज समस्या निर्माण होत असल्याने ते तणावाखाली आहेत, असे समजते. आदिवासी बहुसंख्य रु ग्णांना सर्वोत्तम सेवा देत जनतेच्या कौतुकास पात्र ठरलेल्या या रु ग्णालयातील समस्या सोडवण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी आक्रमक होण्याची अत्यावश्यकता आहे.
इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या घोटी ग्रामीण रुग्णालयात तालुक्यासह बाहेरील अनेकांना तत्पर आरोग्यसेवा देण्यात येते. दैनंदिन आजारांवरील उपचारासह स्त्रीरोग, गुप्तरोग, नेत्ररोग, विविध शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येतात. एकूण चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे येथे मंजूर आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीवास यांची बदली झाल्याने त्यांचा कार्यभार जूनपासून डॉ. सुरेश घोलप यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्यासह डॉ. धनश्री पाटील या वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाची धुरा सांभाळत आहेत. १६ जुलैपासून त्या दीर्घ रजेवर जात असल्याने एवढ्या मोठ्या
रुग्णालयाचा कारभार एकमेव वैद्यकीय अधीक्षक डॉ. घोलप यांनाच सांभाळावा लागणार आहे. यातूनच महिलांसाठी डॉक्टर नसल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रि या, महिलांचे विविध आजार यावर उपचार करणार तरी कोण, असा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
वाडीवऱ्हे, घोटी, इगतपुरी, रेल्वे पोलीस ठाणे या चारही पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक होणाऱ्या अपघातातील रु ग्णांना हेच रु ग्णालय सोयीस्कर असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. मृतांचे शवविच्छेदन, दैनंदिन जवळपास २०० रु ग्णांची तपासणी, त्वचारोग, गुप्तरोग, नेत्ररोग, महिलांचे आजार, प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, नाशिक येथील बैठका, प्रशासकीय कामकाज, न्यायालयात नियमित साक्ष आदि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या डॉ. घोलप यांच्यावर आल्या आहेत. परिणामी निर्माण होणाऱ्या परिस्थितीपुढे ते हतबल होऊनही आपल्या जबाबदाऱ्या कौशल्याने पार पाडीत आहेत. जनतेत त्यांची प्रतिमा अत्यंत चांगली असल्याने वादाचे प्रसंग घडत नाहीत. मानवाधिकाराच्या दृष्टीने एकमेव वैद्यकीय अधिकाऱ्यावरील एवढ्या जबाबदाऱ्या पाहता त्यांना जेवणासाठीही सवड मिळत नसल्याची सत्य परिस्थिती दिसते.
घोटी ग्रामीण रुग्णालयात जनतेच्या आरोग्यसेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचारी प्रचंड तणावाखाली आले आहेत. परिणामी चांगले काम करूनही सर्वजण हतबल झाल्याचे दिसते.
या रुग्णालयात तातडीने उर्वरित तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरल्यास अनेक प्रश्न संपुष्टात येणार आहेत. ही पदे भरण्यासाठी रुग्णालयाने वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयांशी पत्रव्यवहार केला असून, नवीन नियुक्त्यांची प्रतीक्षा आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि जनतेने आक्रमक होऊन पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.
आरोग्यासारख्या संवेदनशील प्रकरणी तातडीने लक्ष न घातल्यास गंभीर प्रकार होण्याची शक्यता वाढली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रश्नी निर्माण झालेली कोंडी फोडणे आवश्यक आहे. (वार्ताहर)