रस्त्यांच्या रुंदीकरणात अडचणी
By admin | Published: May 16, 2015 01:15 AM2015-05-16T01:15:42+5:302015-05-16T01:16:07+5:30
रस्त्यांच्या रुंदीकरणात अडचणी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात अडथळा ठरणारी सुमारे ७५० झाडे तोडण्याची परवानगी न्यायालयाने देतानाच वड, पिंपळ, नांदुरकी आदि पायकस प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केल्याने प्रामुख्याने दिंडोरीरोड व पेठरोड येथील रस्त्यांच्या रुंदीकरणात अडचणी उत्पन्न होणार आहेत. या दोन्ही रस्त्यांवर वड, पिंपळ, नांदुरकी या प्रजातीची सुमारे ११५ झाडे आहेत. दरम्यान, गंगापूररोड येथे या वृक्षांची संख्या ३ ते ५ असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. महापालिकेमार्फत सद्यस्थितीत ८२ कि.मी. रस्त्यांच्या डांबरीकरण व रुंदीकरणाची कामे सुरू असली तरी २३ कि.मी. रस्त्यांची कामे वृक्षतोडीस परवानगी नसल्याने रखडली होती. मात्र, आता न्यायालयाने काही अटी-शर्तींवर वृक्षतोडीस परवानगी दिल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने वृक्षतोडीअभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामांकडे लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेने न्यायालयाकडे दोन हजार ६०९ झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने त्यासंबंधी आढावा घेण्याकरीता समिती नियुक्त केल्यानंतर समितीने त्यातील ७९० झाडे तोडण्याची आवश्यकता नसल्याचा अहवाल दिला होता. दरम्यान, न्यायालयाने वड, पिंपळ, नांदुरकी आदि पायकस प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई करतांनाच विविध अटी घातल्या आहेत. न्यायालयाने सुमारे ७५० झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर बांधकाम विभागाने त्यादृष्टीने कामकाजास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बांधकाम विभागामार्फत रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या वड, पिंपळ, नांदुरकी वृक्षांचा सर्व्हे करण्यात आला असता दिंडोरीरोडवर सर्वाधिक वड, पिंपळ आणि नांदुरकी वृक्ष असून, त्याखालोखाल पेठरोडवर या वृक्षांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या दोन रस्त्यांच्या कामात महापालिकेला अडथळे उत्पन्न होणार असून त्यातून सहमतीने कसा मार्ग काढायचा यावर विचार सुरू आहे. गंगापूररोडवर मात्र या वृक्षांची संख्या मोजकीच असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि महापालिकेकडूनही वृक्षतोडीबाबत याच रस्त्याला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)