आजी-माजी आमदारांच्या वादात पक्षाची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:55 PM2017-10-28T23:55:08+5:302017-10-29T00:14:01+5:30
भाभानगर येथे प्रस्तावित स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यातील वादामुळे भाजपा पदाधिकाºयांची मात्र अडचण झाली असून, कोणीही पदाधिकारी पक्षाची भूमिका स्पष्टपणे प्रदर्शित करण्यास तयार नाही.
नाशिक : भाभानगर येथे प्रस्तावित स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यातील वादामुळे भाजपा पदाधिकाºयांची मात्र अडचण झाली असून, कोणीही पदाधिकारी पक्षाची भूमिका स्पष्टपणे प्रदर्शित करण्यास तयार नाही. वसंत गिते यांचे सुपुत्र व स्थानिक नगरसेवक तथा उपमहापौर प्रथमेश गिते यांनी मात्र नागरिकांसोबत राहत कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयासाठी जागा न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे, तर आमदार फरांदे यांनीही त्याच जागेचा आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळे या वादात कुणाला माघार घ्यावी लागणार आणि कुणाची सरशी होणार याकडे आता लक्ष लागून आहे. शासन अनुदानातून साकार होणाºया स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून सध्या आजी-माजी आमदारांमध्ये संघर्ष पेटला आहे. आमदार फरांदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे वजन वापरत महापालिकेकडून ठराव प्राप्त करून घेतल्याची खेळी खेळली असतानाच संतप्त झालेल्या वसंत गिते व त्यांचे सुपुत्र उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आता स्थानिक नागरिकांच्या मदतीने स्त्री रुग्णालयाला जागा देण्यास विरोधाचे अस्त्र उगारले असून प्रसंगी, रस्त्यावरही उतरण्याचा इशारा दिला आहे. भाजपाच्या दोन नेत्यांमध्येच सामना रंगल्याने पक्षाच्या पदाधिकाºयांची मात्र मोठी पंचाईत झाली आहे. महासभेने अगोदर वसंत गिते यांच्या बाजूने कौल देत स्त्री रुग्णालयासाठी भाभानगरच्या जागेऐवजी टाकळीरोडवरील जागेचा प्रस्ताव मंजूर करत तो शासनाकडे रवानाही केला होता. परंतु, महासभेच्या या भूमिकेमुळे आमदार फरांदे यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठत रुद्रावतार धारण केल्याने नगरसेवक सुप्रिया खोडे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अशासकीय ठराव आणला गेला. महासभेच्या दुसºयाच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापौरांना तातडीने भाभानगरचा ठराव करून देण्याची सूचना केली आणि तासाभरातच ठराव फरांदे यांच्या हाती सोपविण्यात आला होता. या साºया प्रकारात वसंत गिते यांना शह दिला गेल्याची चर्चा सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी स्त्री रुग्णालयाला जागा देण्यास विरोध दर्शविला तर उपमहापौर प्रथमेश गिते यांनीही स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून महापौरांसह आयुक्तांना निवेदन देत विरोध कायम ठेवला. फरांदे यांनी सदर रुग्णालय हा पक्षाचा प्रकल्प असल्याचे सांगायला सुरुवात केली असली तरी पक्षातील एकही पदाधिकारी या विषयावर जाहीरपणे बोलायला तयार नाही. आजी-माजी आमदारांच्या वादात पक्षाची मोठी अडचण झाली असून, महापौरांनीही प्रशासनावरच सदर विषय ढकलून देणे पसंत केले आहे. शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनीही या विषयावर पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असे सांगत अधिक भाष्य करणे टाळले आहे. त्यामुळे, पक्ष कोणाच्या पारड्यात वजन टाकतो, याची आता प्रतीक्षा आहे.
पालकमंत्रीच घेणार निर्णय
स्त्री रुग्णालयाला भाभानगरची जागा द्यावी, असा मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन पालकमंत्री गिरीश महाजन हेच नाशिकला आले होते आणि त्यांच्याच आदेशाने महापौरांनी भाभानगरच्या जागेचा ठरावही करून दिलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा निर्माण झालेला जागेचा वाद पालकमंत्रीच सोडवतील, अशी भूमिका पदाधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखविली आहे. दरम्यान, येत्या सोमवारी (दि.३०) पालकमंत्री नाशिकला येण्याची शक्यता असून, त्यावेळी रुग्णालयाच्या जागेचा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत.
रुग्णालयाच्या वादात राष्टÑवादीचीही उडी
स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून भाजपातील आजी-माजी आमदारांमध्ये रण पेटले असताना आता या वादात राष्टÑवादी महिला आघाडीने उडी घेत सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेचा पर्याय सुचविला आहे. राष्टÑवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.