अग्निशमन केंद्रास खोडा

By admin | Published: November 30, 2015 11:04 PM2015-11-30T23:04:37+5:302015-11-30T23:06:17+5:30

दिरंगाई : नोकर भरतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पडून; अग्निशमन केंद्र बंदच

Dig the fire fighting center | अग्निशमन केंद्रास खोडा

अग्निशमन केंद्रास खोडा

Next

भगूर:नगरपालिकेने ५० लाख रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी उभारलेल्या अग्निशमन केंद्राकरिता जिल्हा प्रशासनाकडे अधिकारी-कर्मचारी भरतीचा पाठवलेला प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून असल्याने केवळ कर्मचारी नसल्यामुळे अग्निशमन केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे नगरपालिकेचे लाखो रुपये वाया जात असून, अग्निशमन केंद्र बंद अवस्थेत पडून आहे.
भगूर गावात आग लागल्यास किंवा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास छावणी परिषद, साऊथ एअरफोर्स, देवळाली, नाशिकरोड अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते. संबंधित अग्निशमन दलाचे बंब येण्यास वेळ लागत असल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढण्याची शक्यता असते. मात्र या संवेदनशील प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने भगूरकरांमध्ये तीव्र नाराजी आहे.
भगूर नगरपालिकेने अग्निशमन केंद्राचे महत्त्व लक्षात घेऊन २०१३ मध्ये १८ लाख रुपये खर्च करून अग्निशमन बंब खरेदी केला. तसेच ३४ लाख रुपये खर्च करून मोठ्या गणपती मंदिराजवळ अग्निशमन सेवा केंद्र व कामगारांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली. आग विझविण्यासाठी व आपत्कालीन परिस्थितीत लागणारे सर्व साहित्यदेखील खरेदी करण्यात आले आहे. नगरपालिकेने रहिवाशांच्या घरपट्टीमध्ये अग्निशमन करही समाविष्ट करून वसुली सुरू केली आहे.
भगूर नगरपालिकेत अग्निशमन केंद्र व इतर विभागाची १७ ते १८ पदे रिक्त असून, वर्षभरापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे नगरपालिकेने कामगार भरतीचा प्रस्ताव पाठविला आहे. अग्निशमन केंद्रासाठी १ अधीक्षक, चालक व चार फायरमन अशा सहा जागांची भरती करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून वारंवार तारीख पे तारीख देत नोकर भरतीचा प्रस्ताव रेटून नेला जात आहे. अशी परिस्थिती केवळ भगूर नगरपालिकेबाबतची नव्हे तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसंदर्भात असल्याचेदेखील समजते. त्र्यंबक पालिकेने पाठविलेल्या कामगार भरतीचा प्रस्ताव रेंगाळलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडे भगूर नगरपालिकेच्या कामगार भरतीचा प्रस्तावदेखील धूळखात पडून असल्याने ५० लाख रुपये खर्च करून उभारलेले अग्निशमन केंद्र व बंब हे एक प्रकारे शोभेची वस्तू ठरली आहे. नगरपालिकेने जिल्हा प्रशासनाकडे वर्षभरात अनेकवेळा नोकरभरतीच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही नोकरीभरती प्रस्तावाच्या फाईलवरील धूळ ‘जैसे थे’च आहे. भगूर पालिकेला आदर्श नगरपालिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर पालिकेसाठी अग्निशमन केंद्र असावे असा विचार पुढे आला आणि त्यासाठीची महाराष्ट्र शासनाकडून तरतूदही करण्यात आली. सुमारे ८० लाख निधी मिळाल्यानंतर युद्धपातळीवर अग्निशमन इमारतीचे काम आणि वाहन खरेदी करण्यात आली. मात्र सर्व सज्जता असतानाही केवळ मनुष्यबळ नसल्याने अग्निशमन केंद्र असून नसल्यासारखे आहे.

Web Title: Dig the fire fighting center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.