नाशिकरोडला दिगंबरा .. दिगंबराचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:30+5:302020-12-30T04:19:30+5:30
दत्तमंदिररोड येथील श्री घैसास दत्तमंदिरात दत्तजयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे काकडा आरती, नंतर दत्त अभिषेक पूजा झाली. दुपारी सत्यनारायण पूजा, महाआरती ...
दत्तमंदिररोड येथील श्री घैसास दत्तमंदिरात दत्तजयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे काकडा आरती, नंतर दत्त अभिषेक पूजा झाली. दुपारी सत्यनारायण पूजा, महाआरती व नैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी दत्त जन्म, महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांमध्ये अंतर ठेवून त्यांना दर्शनासाठी सोडले जात होते. कोरोनामुळे पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला.
बिटको महाविद्यालयामागील घाडगे मळ्यातील महानुभाव पंथाच्या एकमुखी दत्तमंदिरात सकाळी महाअभिषेक व पूजा करण्यात आली. पारायण व विडा अवसर कार्यक्रम झाला. दुपारी महाआरती झाली. सायंकाळी दत्त जन्मोत्सव व महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
देवळाली गावातील सोमवार बाजारातील दत्तमंदिरात सकाळी मूर्तीला महाअभिषेक करून पूजा झाली. गुरूचरित्राची सांगता झाली. दुपारी व सायंकाळी महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी पालखी प्रदक्षिणा झाली.
नाशिकरोड येथील दुर्गामाता मंदिराच्या आवारातील दत्तमंदिर, मुक्तिधाम, नाशिकरोड पोलीस ठाणे दत्तमंदिर, देवळालीगाव गाडेकर मळ्यातील साईबाबा मंदिर, देवीचौक लक्ष्मीनारायण मंदिर, मोटवानी रोडवरील मंदिरात दत्तजयंतीनिमित्त दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. मुक्तिधामबाहेरील शिवम काॅम्प्लेक्स, कोठारी कन्या शाळेजवळ, रामदास स्वामीनगर, कॅनॉलरोड आदी ठिकाणच्या दत्तमंदिरात तसेच औदुंबराच्या झाडाखाली स्थापन केलेल्या छोट्या दत्तमंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले. नाशिकरोड, जेलरोड, उपनगर भागातील सर्व श्रीस्वामी समर्थ केंद्रात श्रीदत्त व नवनाथ पारायणाची सांगता होऊन पूजा करून भक्तिभावाने दत्तजयंती साजरी करण्यात आली.