दिगंबर आखाड्याला बदनाम करण्याचा प्रयत्न
By admin | Published: September 16, 2015 11:42 PM2015-09-16T23:42:21+5:302015-09-16T23:43:59+5:30
वैष्णवदास : रामसनेहीदास यांच्यावर बहिष्कार नाही
पंचवटी : चतु:संप्रदाय आखाड्यात झालेल्या बैठकीत दिगंबर आखाड्याचे कोणीही महंत उपस्थित नव्हते; मात्र तरीदेखील काही संधिसाधू दिगंबर आखाडा, लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांच्यावर बहिष्कार टाकल्याची अफवा पसरवून विनाकारण रामसनेहीदास व दिगंबर आखाड्याची बदनामी करत आहे, अशी माहिती दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराज यांनी पत्रकारांना दिली.
सध्या काही संधिसाधू दिगंबर आखाडा व लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास यांच्यात फूट पाडण्याचे काम करत असून, ते अत्यंत चुकीचे आहे. महंत रामसनेहीदास हे दिगंबर आखाड्याशी संबंधित असून, लक्ष्मीनारायण मंदिराचा व दिगंबर आखाड्याचा तपोवनात सिंहस्थ कुंभमेळा भरावा यासाठी मोठे योगदान आहे. लक्ष्मीनारायण मंदिर हे नाशिकमधील मोठे मंदिर असून, मंदिरातर्फे यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यासाठी वारंवार साधुग्रामसाठी जागा दिलेली होती. साधूच्या वेशातील काहीजण विनाकारण बदनामी करून आपापसात वाद लावून देण्याचे काम करत असून, दिगंबर आखाड्याशी संबंधित असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराच्या रामसनेहीदास यांच्यावर आम्ही कोणताही बहिष्कार टाकलेला नाही. तसेच त्यांना बहिष्कृत करण्याचा अधिकार अन्य कोणत्याही आखाड्यांना नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी महंत कृष्णदास, महंत रामकिशोरदास, शिवशंकरदास आदि उपस्थित होते. (वार्ताहर)