संशोधनासाठी डिजिटल अभ्यासक्रम; वैद्यकीय शिक्षणाची स्कील लॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 01:42 AM2022-03-24T01:42:29+5:302022-03-24T01:43:04+5:30

वैद्यकीय शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन शिक्षणाची पुरेशी साधने आणि संधी उपलब्ध व्हावीत, यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्कील लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच संशोधनासाठी डिजिटल अभ्यासक्रम, आयुष रिसर्च तसेच अवयवदान, कुपोषण उपक्रमासाठीदेखील आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

Digital courses for research; Medical Education Skill Lab | संशोधनासाठी डिजिटल अभ्यासक्रम; वैद्यकीय शिक्षणाची स्कील लॅब

संशोधनासाठी डिजिटल अभ्यासक्रम; वैद्यकीय शिक्षणाची स्कील लॅब

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य विद्यापीठ : ४७० कोटींचा अर्थसंकल्प सादर; ९२९ कोटींची वित्तीय तूट

नाशिक : वैद्यकीय शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन शिक्षणाची पुरेशी साधने आणि संधी उपलब्ध व्हावीत, यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्कील लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच संशोधनासाठी डिजिटल अभ्यासक्रम, आयुष रिसर्च तसेच अवयवदान, कुपोषण उपक्रमासाठीदेखील आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीचे आयोजन कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीस प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व अधिसभा सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सचिन मुंबरे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला, तर लेखा अहवाल डॉ. मिलिंद देशपांडे यांनी सादर केला.

विद्यापीठाच्या २०२२ - २०२३ अर्थसंकल्प परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारांत विभागला आहे. या अर्थसंकल्पात विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न ४७०८०.८३ लक्ष इतके अपेक्षित असून, उत्पन्नाच्या तुलनेत एकत्रित खर्च ४८०१०.७६ लक्ष इतका अपेक्षित असल्याने वित्तीय तूट ९२९.९३ लक्ष इतकी अपेक्षित आहे.

 

संशोधन कार्यासाठी क्लिनिकल ट्रायल युनिटकरिता २०० लक्ष, आयुष रिसर्च १०० लक्ष, रिसर्च प्रोजेक्टकरिता ७५ लक्ष, रिसर्च लॅबकरिता १५ लक्ष, रिसर्च ॲक्टीव्हिटीकरिता १२.५ लक्ष रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याणासाठी कल्याणकारी योजनेत धन्वंतरी विद्याधन योजना, बहीःशाल शिक्षण, मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, कमवा व शिका योजना, विद्यार्थी अपघात विमा योजना व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आदींसाठी २२८० लक्ष रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

 

शिक्षक व विद्यार्थी मानसिक ताण-तणावापासून मुक्त राहावेत यासाठी प्रभावी शिक्षण व उपक्रमासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अवयवदान, कुपोषण, स्वच्छमुख अभियानसंदर्भात सामाजिक जनजागृती करणे व विविध उपक्रमांसाठी ३० लाख, शिक्षकांना विविध वित्तीय कामकाजाचे प्रशिक्षण, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम यासाठी ११० लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. ई-ग्रंथालयाकरिता १ कोटी रुपये इतकी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

--इन्फो--

कर्मचाऱ्यांना खूषखबर

विद्यापीठाच्या कामानिमित्त संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास विद्यापीठाकडून मदत मिळावी, यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसाठी विद्यापीठातील केंद्राला १५ लाखांची तरतूद करण्यात आली.

Web Title: Digital courses for research; Medical Education Skill Lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.