डेकाटे अखेर जिल्हा परिषदेत रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:14 AM2018-06-30T01:14:37+5:302018-06-30T01:14:54+5:30
जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी पदावरील वादावर अखेर पडदा पडला असून, प्रशासनावर मात करीत डॉ. विजय देकाटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. गेल्या महिनाभरापासून देकाटे यांना रुजू करून घेण्याबाबत जिल्हा परिषदेकडून चालढकल केली जात होती.
नाशिक : जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी पदावरील वादावर अखेर पडदा पडला असून, प्रशासनावर मात करीत डॉ. विजय देकाटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. गेल्या महिनाभरापासून देकाटे यांना रुजू करून घेण्याबाबत जिल्हा परिषदेकडून चालढकल केली जात होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांची भंडारा येथे बदली झाली तर त्यांच्या जागी डॉ. विजय देकाटे यांना शासनाने नियुक्ती दिली होती. या काळात डॉ. वाघचौरे हे रजेवर असल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केलेले नव्हते. त्यामुळे डॉ. देकाटे हे ४ जून रोजी जिल्हा परिषदेत सूत्रे घेण्यासाठी आले असता त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी रुजू करून घेतले नाही. बदलीचे आदेश येऊनही डॉ. वाघचौरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर दावा सांगितला होता, तर डॉ. देकाटे यांनाही रुजू करून घेतले जात नव्हते. यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. नाशिक जिल्ह्णात कुपोषणासारख्या महत्त्वाच्या विषयावर मोठे काम सुरू असताना तसेच दूषित पाण्याचे नमुने आढळल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालेला असताना मुख्य कार्यकारी अधिकारी तत्काळ निर्णय घेत नसल्यामुळे त्यांच्याविषयीच्यादेखील चर्चा या काळात चांगल्याच रंगल्या. बदलीच्या या खेळात गिते यांच्यावर राजकीय दबाव आल्याचीदेखील चर्चा झाली, तर आरोग्य विभागाच्या सचिवांनीदेखील याप्रकरणी तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याने अखेर डॉ. देकाटे यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यानच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हेदेखील रजेवर असल्यामुळे याप्रकरणी काय निर्णय होतो या मॅटच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शनिवार, दि. ३० रोजी या प्रकरणाची सुनावणी होती. तत्पूर्वी दि. २७ रोजी सचिवांनी जिल्हा परिषदेला पत्र देऊन डॉ. देकाटे यांना रुजू करून घेण्याबाबतचे पत्र दिले होते. त्यानुसर देकाटे हे शुक्रवारी रुजू होत त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.
प्रशासन तोंडघशी
पुणे येथील कुटुंब कल्याण सहायक संचालक पदावरून जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बदली होऊन आलेले डॉ.विजय देकाटे यांना रुजू करून घेण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून चालढकल केली जात होती.वारंवार आश्वासने देऊनही त्यांना प्रत्यक्षात दाखल करून घेतले जात नव्हते अखेर देकाटे यांनी थेटशासनाच्या आदेशाचा आधार घेत जिल्हा आरोग्य अधिकारीपदाच्या खुर्चीचा ताबा घेतला. विशेष म्हणजे कर्मचारी वर्गाने त्यांचे जोरदार स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अनुपस्थितीत देकाटे यांनी चार्ज मिळविल्याने देकाटे प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन तोंडघशी पडले.