माणसाने उपभोगाचा अतिरेक थांबवावा : दिलीप कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:26 AM2019-06-24T00:26:35+5:302019-06-24T00:26:50+5:30
माणसाने आपल्या हव्यासीवृत्तीने निसर्गाची सेंद्रिय व्यवस्था नाहीशी करण्याचा सपाटा लावला आहे. मानवाचा उपभोगाचा वाढता अतिरेक निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या मुळावर उठला आहे, त्याचा सर्वाधिक धोका सजीवसृष्टीला निर्माण होताना दिसत असल्याचे मत पर्यावरणाचे अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
नाशिक : माणसाने आपल्या हव्यासीवृत्तीने निसर्गाची सेंद्रिय व्यवस्था नाहीशी करण्याचा सपाटा लावला आहे. मानवाचा उपभोगाचा वाढता अतिरेक निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या मुळावर उठला आहे, त्याचा सर्वाधिक धोका सजीवसृष्टीला निर्माण होताना दिसत असल्याचे मत पर्यावरणाचे अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
निसर्गभान संस्थेच्या वतीने अशोकस्तंभावरील रुंग्टा विद्यालयाच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात कुलकर्णी ‘शाश्वत जीवनशैली : आचार अन् विचार’ या विषयावर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, माणसाचा वाढता उपभोग पर्यावरण व निसर्गाच्या हानीसाठी जबाबदार आहे. माणसाने गुणवत्ता विसरली असून, केवळ संख्यात्मक प्रमाणवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी शेतीव्यवस्थाही कोलमडली आहे. झाडे तोडून वनसंपदा संपुष्टात आणली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जंगल लावता येत नाही
झाडे लावली जाऊ शकतात; मात्र जंगले लावता येऊ शकत नाहीत. जंगलांची निर्मिती नैसर्गिकरीत्या होणारी एक उत्क्रांती आहे. झाडे लावून पर्यावरणाचा समतोल टिकविला जाऊ शकतो. विकासाचा विचार शुद्ध असायला पाहिजे. अतिरेकी उपभोग माणसाने थांबवून शाश्वत विकास घडवून आणण्याची गरज आहे असेही कुलकर्णी म्हणाले.