नाशिकच्या मिसळचेही चाहते होते दिलीपकुमार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:50+5:302021-07-08T04:11:50+5:30
नाशिक : ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचे देवळाली कॅम्पच्या बार्न्स स्कूलला झालेले शिक्षण तसेच उमेदीची वर्षं त्यांची देवळाली परिसरात गेलेली ...
नाशिक : ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचे देवळाली कॅम्पच्या बार्न्स स्कूलला झालेले शिक्षण तसेच उमेदीची वर्षं त्यांची देवळाली परिसरात गेलेली होती. त्यामुळे या परिसराबरोबरच नाशिकच्या मिसळचेही (तत्कालीन शब्द उसळ) ते चाहते होते. तसेच मराठी परिसरात काही वर्ष गेल्याने त्यांना मराठी भाषेबद्दलदेखील विशेष आपुलकी आणि ममत्व होते.
ज्या काळात त्यांचे नाव केवळ युसूफ खान होते, त्या वेळेपासून त्यांचे नाशिकशी ऋणानुबंध जुळलेले होते. काही वर्षांचा काळ नाशिकमध्ये व्यतीत केलेला असल्याने दिलीपकुमार यांचे काही वर्षांनी तरी नाशिकला येणे जाणे असायचे. उर्दू तसेच हिंदी भाषेवर तर त्यांची पकड होतीच; मात्र मराठीतही ते बोलू शकायचे. त्याबाबत जर कुणी त्यांना विचारले तर ते सांगायचे की माझे शिक्षण महाराष्ट्रात म्हणजेच नाशिकजवळ देवळाली कॅम्पला झाले आहे. दिलीपकुमार यांचे वडील गुलाम खान हे स्वातंत्र्यपूर्व काळात फळांचे होलसेल व्यापारी होते. तसेच नाशिकच्या तोफखाना केंद्राला म्हणजेच लष्कराला फळपुरवठा करण्याचे कंत्राटदार म्हणूनदेखील ते प्रदीर्घ काळ काम करीत होते. साधारणपणे १९४२ साली दिलीपकुमार यांच्या आई आयेशा खान यांना अस्थम्याचा त्रास खूपच बळावला होता. त्यामुळे त्यांना देवळाली कॅम्पच्या फातिमा सॅनोटरीत उपचारासाठी ठेवण्यात आले होते. देवळाली कॅम्पला असतानाच दिलीपकुमार यांच्या मातोश्री आयेशा खान यांचे निधन झाले होते. त्यामुळे देवळाली कॅम्पलाच त्या दोघांचीही कबर आहे. दिलीपकुमार तंदुरुस्त असेपर्यंत अनेकदा ते त्यांच्या आई-वडिलांच्या कबरीवर चादर चढवायला येत असत.
इन्फो
सुपरहिट गंगा जमुनाचे चित्रीकरण नाशकात
दिलीपकुमार अभिनित आणि निर्मिती असलेल्या ‘गंगा जमुना’ या चित्रपटातील काही भागाचे चित्रीकरण दिलीपकुमार यांनी नाशिकच्याच परिघात केले होते. साधारणपणे १९६० च्या आधी नांदुर वैद्य, रोकडोबा वाडी परिसरात हे चित्रीकरण झाले होते. विशेष म्हणजे या चित्रपटात दिलीपकुमार हेच निर्माते असल्याने त्यांनी त्यांचे बंधू नासीर खान यांनादेखील चित्रपटात अभिनयाची संधी दिली होती. १९६१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिटही झाला होता. त्यामुळे आपली निर्मिती असल्यास आपल्याला ओढ वाटणाऱ्या आणि जिथली माहिती आहे, अशा मातीत त्याचे चित्रीकरण करण्याची त्या काळातील पद्धत दिलीपकुमार यांनीदेखील अवलंबली होती. या चित्रपटापासून एक वेगळी इमेज निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने तसेच चित्रपटदेखील सुपरहिट झाल्याने हा चित्रपट त्यांच्या स्वत:च्या आवडत्या चित्रपटांपैकी एक होता. त्यावेळी नाशिकमध्ये असतानादेखील त्यांनी त्यांचे बंधू नासीर खान यांच्यासमवेत नाशिकच्या गरमागरम उसळ (सध्याची मिस्सळ), फाफडा, शेव, पोहे, तसेच गरमागरम झुणका भाकरीचाही यथेच्छ आनंद घेतल्याचे त्यांनी काही मुलाखतींमध्ये सांगितले होते.