नाशिकमधील फळबागायतदाराचा मुलगा 'दिलीप कुमार', 20 वर्षांपूर्वीची संस्मरणीय भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 01:19 PM2021-07-07T13:19:13+5:302021-07-07T13:27:50+5:30
देवळाली कॅम्प येथील भारतीय सैन्यदलाच्या आर्टीलरी सेंटरमध्ये दिलीप कुमार यांच्या वडिलांकडून फळांचा पुरवठाही केला जात असे.
अझहर शेख
नाशिक : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (मोहम्मद युसुफ खान) यांचे नाशिकशी बालपणाचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. त्यांच्या आई-वडिलांच्या कबरी आजही त्याची साक्ष देतात. येथील छावणी परिषदेच्या देवळाली कॅम्प भागात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील गुलाम सरवर खान हे त्यावेळेचे नाशिकचे प्रसिध्द फळ बागायतदार होते.
देवळाली कॅम्प येथील भारतीय सैन्यदलाच्या आर्टीलरी सेंटरमध्ये दिलीप कुमार यांच्या वडिलांकडून फळांचा पुरवठाही केला जात असे. त्यांचे येथे मोठे घरदेखील होते, एवढेच नव्हे तर दिलीपकुमार हे देवळाली कॅम्पच्या बार्न्स स्कुलचे विद्यार्थीही होते. तसेच येथील मुसा कॉटेजमध्ये त्यांनी अक्षरओळखीचे (बालवाडी) धडे गिरविले होते. येथूनच दिलीपकुमार यांनी तारुण्यात पुणे गाठले. दिलीपकुमार यांच्या मातोश्री आयेशा गुलाम सरवर खान यांचे देवळाली कॅम्पमध्येच निधन झाले होते. आईच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी कुटुंबासह मुंबईला स्थलांतर केले. त्यांच्या वडिलांचे मुंबईत निधन झाले होते. मात्र, त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्येच करण्यात आला होता. तसेच त्यांच्या मोठे बंधुंचे पार्थिवाचेही देवळाली कॅम्प जवळील वडनेर रस्त्यावरील ईदगाहजवळील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला होता. आजही दिलीपकुमार यांचे पुतणे जावेद नूर खान हे देवळाली कॅम्पमध्येच वास्तव्यास आहे.
दिलीपकुमार आपल्या आईच्या बरसीच्या (वर्षश्राध्द) तारखेला देवळाली कॅम्प येथील कब्रस्तानात पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांच्यासह हजेरी लावत असत. सुमारे पंधरा ते वीस वर्षांपुर्वी ते येथील कब्रस्तानात आपल्या आई-वडिलांच्या कबरींवर पुष्पांची चादर अर्पण करण्यासाठी आले होते. त्यावेळी 'लोकमत'चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी त्यांची छायाचित्रे टिपली होती.