दिरंगाई : शंभर टक्के निधी येऊनही २५ टक्केच कामे पूर्ण
By admin | Published: January 31, 2015 12:22 AM2015-01-31T00:22:42+5:302015-01-31T00:23:22+5:30
साखळी बंधाऱ्यांना ‘लालफितीचा बांध’
नाशिक - आघाडी सरकारच्या काळात दुष्काळ व टंचाई निवारणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केलेल्या मुख्यमंत्री साखळी बंधाऱ्यातील कामांना जिल्ह्यात निधी असूनही सरकारी लालफितीचा ‘बांध’ आडवा आल्याने मंजूर असलेल्या ४३ साखळी बंधाऱ्यांपैकी अवघी अकराच कामे पूर्ण झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण ४३ कामांसाठी आघाडी सरकारने शंभर टक्के निधी उपलब्ध करून देऊनही प्रत्यक्षात ४० टक्केच निधी स्थानिक स्तर विभागाला प्राप्त झाल्याचे समजते.
आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यभरातील टंचाई व दुष्काळ निवारणार्थ राज्यभरात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून साखळी बंधाऱ्यांना मान्यता दिली. त्यात जिल्ह्यात एकूण ४३ साखळी बंधारे मंजूर करण्यात आल्याचे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. संधानशिव यांनी सांगितले. या ४३ साखळी बंधाऱ्यांना सीमेंट प्लग बंधाऱ्यांचे स्वरूप होते. त्यानुसार जिल्ह्यात ४३ साखळी बंधारे मंजूर करण्यात आले असून, त्यापोटी शासनाने सुमारे ८ कोटी ५९ लाखांचा निधीही मंजूर केला. त्यानुसार प्रत्यक्षात जिल्हा नियोजन समितीकडे या ४३ साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटी ५९ लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. या ४३ पैकी ४० साखळी बंधाऱ्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यात येऊन त्यातील आजमितीस ११ साखळी बंधाऱ्यांची कामेही पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र जिल्हा नियोजन मंडळाकडून स्थानिक स्तर विभागाला एकूण मंजूर व उपलब्ध रकमेच्या ४० टक्केच निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने ही अपूर्ण कामांची संख्या २९ च्या घरात पोहोचली. या ४३ पैकी तीन कामांचे कार्यारंभ आदेश तर अद्यापही निघालेले नाहीत. स्थानिक स्तर विभागाला ४० टक्केच निधी उपलब्ध झाल्याचे पाहून ही ४० कामे घेणाऱ्या मक्तेदारांनी मग २९ कामे अपूर्णावस्थेत सोडून दिल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)