दिंडोरीत ९१ उमेदवार रिंगणात

By admin | Published: December 28, 2015 10:55 PM2015-12-28T22:55:13+5:302015-12-28T22:58:28+5:30

नगरपंचायत निवडणूक : शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांची माघार

In Dindori, 91 candidates are in the fray | दिंडोरीत ९१ उमेदवार रिंगणात

दिंडोरीत ९१ उमेदवार रिंगणात

Next

दिंडोरी : नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत २३ उमेदवारांनी माघार घेतली असून, १७ जागांसाठी तब्बल ९१ उमेदवार रिंगणात आहेत.
विद्यमान सरपंच छबाबाई वाघ, माजी सरपंच व विद्यमान सदस्य विजयबापू देशमुख, आनंदा कराटे, विद्यमान सदस्य किशोर रेहरे, परशराम कराटे, जयवंता धामोडे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे, तर युवक कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील आव्हाड आदिंनी माघार घेतली.
नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी १७ प्रभागांतून ११५ उमेदवारांनी १५४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. निवडणूक निरीक्षक रघुनाथ गावडे, निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश भोगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत माघारी प्रक्रिया पार पडली. एकूण ११४ उमेदवारांपैकी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत २३ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र तब्बल ४० अपक्ष उमेदवारांनी माघार न घेता स्वबळ अजमावण्याचा निर्णय घेतल्याने अनेक प्रभागात बहुरंगी लढती रंगणार आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी काही अपक्ष उमेदवारांना पक्षीय उमेदवारांनी माघारीसाठी गळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्या उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती त्या पक्षाच्या नेत्यांनीही माघारीसाठी प्रयत्न केले; परंतु अनेक उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आपली उमेदवारी कायम ठेवली. शिवसेना १६, भाजपा १४, कॉँग्रेस १०, राष्ट्रवादी ६, मनसे ३, तर माकप २ जागा लढवत असून, ४० अपक्ष रिंगणात आहेत.
प्रभाग-१ मधून गोरख पवार यांनी माघार घेतली असून, येथे आता चार पक्षीय उमेदवारांबरोबर पाच अपक्ष असे एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग-२ मधून रचना विक्रमसिंह राजे यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग-३ मध्ये सुनील आव्हाड, सचिन आव्हाड, कैलास देशमुख यांनी माघार घेतली असून, आता पक्षीय तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग-४ मधून सोनाली मनोजकुमार पगारे यांनी माघार घेतली असून, पक्षीय तिरंगी लढत रंगणार आहे.
प्रभाग-५ मधून तीन पक्षीय उमेदवारांबरोबर तीन अपक्ष अशी षटकोनी लढत रंगणार आहे. प्रभाग-६ मधून रोहिणी परशराम कराटे यांनी माघार घेतली असून, चार पक्षीय उमेदवारांसह दोन अपक्ष अशी षटकोनी लढत होणार आहे. प्रभाग-७ मध्ये प्रीतम देशमुख यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग-८मध्ये घनश्याम चव्हाण, प्रमोद देशमुख यांनी माघार घेतली असून, दोन पक्षीय उमेदवार व चार अपक्ष अशी षटकोनी लढत रंगणार आहे. प्रभाग-९ मधून कार्तिकी अरुण गायकवाड यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व चार अपक्ष अशी सप्तरंगी लढत रंगणार आहे.
प्रभाग-१० मध्ये छाया धोंडीराम जाधव यांनी माघार घेतली असून, दोन पक्षीय व एक अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग-११ मध्ये जयेश श्याम गवारे यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व पाच अपक्ष अशी अष्टकोनी लढत होणार आहे. प्रभाग-१२ मध्ये पुष्पा रमेश जाधव, अर्चना प्रवीण सोनवणे यांनी माघार घेतली असून, येथे दोन पक्षीय व एक अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग-१३ मध्ये संतोष पगार, दत्तात्रेय शिंदे, दीपक जाधव यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व तीन अपक्ष यांच्यात षटकोनी लढत रंगणार आहे. प्रभाग १४ मधून कुणीही माघार घेतली नसून दोन पक्षीय व दोन अपक्ष यांच्यात चौरंगी लढत होत आहे. प्रभाग-१५ मधील आनंदा कराटे यांनी माघार घेतली असून, पक्षीय पाच व तीन अपक्ष अशी अष्टकोनी लढत होत आहे. प्रभाग १६ मधून कुणीही माघार घेतली नसून तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत होत आहे, तर प्रभाग-१७ मधून राधिका श्यामराव फसाळे यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. दरम्यान, आज मंगळवार रोजी निशाणी वाटपानंतर प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होणार असून, अधिकृत माघारीची वेळ जरी संपली असली तरी काही अपक्षांची मनधरणी करत जाहीर पाठिंबा घेण्यासाठी काही उमेदवारांची धडपड सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: In Dindori, 91 candidates are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.