दिंडोरीत सावत्र मातेकडून बालकाच्या सर्वांगाला चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:38+5:302021-06-09T04:18:38+5:30
दिंडोरी तालुक्यातील पाडे येथील राजेंद्र अपसुंदे यांच्या तीन वर्षीय गतिमंद मुलास सोडून त्याची आई कौटुंबिक कलहातून घरातून निघून गेली ...
दिंडोरी तालुक्यातील पाडे येथील राजेंद्र अपसुंदे यांच्या तीन वर्षीय गतिमंद मुलास सोडून त्याची आई कौटुंबिक कलहातून घरातून निघून गेली होती. त्यानंतर अपसुंदे यांनी मेहुणीशीच लग्न केल्याने आईची जागा बालकाची मावशी असलेल्या वर्षा अपसुंदे यांनी घेतली. आई सोडून गेल्यानंतर तिची उणीव मावशी भरून काढेल असेच नातलगांना वाटत होते. मात्र, दुर्दैवाने त्या महिलेतील सावत्र माता जागी झाल्याने तिने बहिणीच्या दिव्यांग मुलाचा छळ सुरू केला. रविवारी (दि.६) दुपारी मुलगा जास्त त्रास देतो म्हणून त्यास पलंगावरून ढकलून देत गरम उचटण्याने त्याच्या अंगावर तसेच गुप्तांगावर चटके देऊन क्रूरतेची परिसीमा गाठली. सदर संतापजनक प्रकार पाहून शेजारच्या महिलांनी त्या मुलास दिंडोरी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यासोबत त्याची सावत्र आईदेखील हजर होती. मंगळवारी (दि.८) सदर घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच घटनेला वाचा फुटली. त्या बालकाच्या वडिलांनी दिंडोरी पोलिसात पत्नीविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर वर्षा राजेंद्र अपसुंदे हिला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध भादंवि कलम ३२६,३२४ तसेच पोस्को कायदा कलम १०,१२ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम कायदा कलम ७५ व ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.